- Home
- Maharashtra
- मोठा निर्णय! मुंबई हायकोर्टाचा मराठा आंदोलकांना इशारा, कोणत्याही परिस्थितीत उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा!
मोठा निर्णय! मुंबई हायकोर्टाचा मराठा आंदोलकांना इशारा, कोणत्याही परिस्थितीत उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा!
Bombay High Court's Stern Order to Maratha Protestors: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्याने हायकोर्टाने आंदोलकांना आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील सर्व रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे दक्षिण मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या तातडीच्या सुनावणीत मोठा आदेश पारित करण्यात आला. मुंबई हायकोर्टाने स्पष्टपणे आदेश दिला आहे की, आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील सर्व रस्ते आणि सार्वजनिक जागा उद्या (2 सप्टेंबर) दुपारी 4 वाजेपर्यंत आंदोलकांनी रिकाम्या कराव्यात.
आंदोलनामुळे रस्ते ठप्प, कोर्टात याचिका
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई महापालिकेच्या बाहेरील परिसर, चर्चगेट स्टेशन, हुतात्मा चौक अशा अनेक प्रमुख भागांत आंदोलकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. याच पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान, न्यायालयाने सरकार आणि आंदोलक दोघांनाही जबाबदार ठरवत कडक भूमिका घेतली.
हायकोर्टाच्या महत्त्वपूर्ण सूचना काय आहेत?
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
"प्रथमदर्शनी, आंदोलनासाठी मिळालेल्या परवानगीच्या अटींचे उल्लंघन झालेले दिसते. मनोज जरांगे पाटील, विरेंद्र पवार यांच्यासह इतर आंदोलकांकडे सध्या कोणतीही वैध परवानगी नाही."
"26 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या हायकोर्टाच्या अंतरिम आदेशाचा भंग झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक सभा आणि आंदोलनाच्या नियमांनुसार सरकारने योग्य ती कारवाई करावी."
"मुंबई शहर ठप्प होऊ नये, विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन सुरळीत राहावे यासाठी हे आदेश जारी करत आहोत."
"उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत आझाद मैदानातील विशिष्ट जागा वगळता संपूर्ण दक्षिण मुंबई रिकामी करा."
“राज्य सरकार आणि पोलिसांनी याची खबरदारी घ्यावी की, आणखी आंदोलक मुंबईत येणार नाहीत.”
मनोज जरांगे पाटलांच्या आरोग्याबाबत न्यायालयाची चिंता
"जर मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, तर त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात यावी," असा निर्देशही न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.
पुढील सुनावणी केव्हा?
या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या (2 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता नियमित खंडपीठासमोर होणार असल्याचे हायकोर्टाने जाहीर केले.
काय घडले, काय पुढे होणार?
आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक विस्कळीत
आंदोलकांनी नियम तोडल्याचे कोर्टाचे मत
आझाद मैदानाशिवाय अन्य ठिकाणी आंदोलनास परवानगी नाही
रस्ते मोकळे न केल्यास कठोर कारवाई होण्याची शक्यता
उद्याची सुनावणी निर्णायक ठरणार

