- Home
- Maharashtra
- Manoj Jarange Patil: "मराठा आरक्षणात छेडछाड केली तर कोर्टात ओबीसी आरक्षणालाही आव्हान देऊ!", मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
Manoj Jarange Patil: "मराठा आरक्षणात छेडछाड केली तर कोर्टात ओबीसी आरक्षणालाही आव्हान देऊ!", मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणावरून जरांगेंनी भुजबळांवर टीका केली. ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्याचा इशारा देतानाच, ते म्हणाले की जर आमच्या आरक्षणाच्या जीआरवर कोर्टात याचिका दाखल केली तर आम्ही १९९४ च्या ओबीसी आरक्षणाच्या जीआरला आव्हान देऊ.

जालना: मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका करत, ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देण्याचा इशारा दिला आहे. "आमचा जीआर रक्त सांडून मिळवलेला आहे. त्यात जर कोणी फेरफार करण्याचा प्रयत्न केला, तर मराठा समाज कोट्यवधींच्या संख्येने रस्त्यावर उतरेल," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
"भुजबळांना मराठा समाज-सरकारचं एकत्र येणं खटकतं"
मनोज जरांगे म्हणाले, "छगन भुजबळ यांना मराठा समाज आणि सरकार यांचं सख्य पटत नाही. त्यांना फक्त ओबीसी नावाखाली राजकीय पोस्टी हव्यात. त्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी 'ओबीसी, ओबीसी'चा नारा देत इतर समाजांना मराठ्यांपासून दुरावण्याचं काम केलं आहे." त्यांनी असा आरोपही केला की, “भुजबळांचा हा खेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आला आहे.”
१९९४ च्या ओबीसी आरक्षण जीआरवर याचिकेचा इशारा
जरांगे पाटील यांनी पुढे म्हटलं, “जर आमच्या आरक्षणाच्या जीआरवर तुम्ही कोर्टात याचिका दाखल केली, तर आम्हीही १९९४ च्या ओबीसी आरक्षणाच्या जीआरला आव्हान देऊ. ५० टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही, हे आम्ही न्यायालयात मांडणार आहोत. या संदर्भातील सर्व कागदपत्रे आमच्या वकिलांनी तयार ठेवलेली आहेत.”
पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
पंकजा मुंडे यांच्या कथित वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, "माझ्या कानावर त्यांचं वक्तव्य आलं नाही, पण त्या असं बोलल्या असतीलच तर मराठा समाजाने सतर्क राहणं गरजेचं आहे." ते पुढे म्हणाले, “ज्यांचं राजकारण मराठ्यांच्या मतांवर उभं राहिलं, तेच नेते जर गोरगरीब मराठा तरुणांच्या मुलावर घाव घालतात, तर ते निंदनीय आहे. मराठवाड्यातील आणि बीड जिल्ह्यातील मराठा नेत्यांनी जातीचा विचार न करता एकत्र येऊन समाजासाठी काम करावं.”
"आमचं खऱ्या अर्थाने आरक्षण आहे, ते बोगस असल्याचं म्हणणाऱ्यांनी स्वतःचं १६ टक्के आरक्षण खोटं आहे की खरं, ते आधी ठरवावं," अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

