मनोज जरांगेंच्या सहा मागण्या पूर्ण झाल्या असल्या तरीही  मराठा आणि कुणबी जाती एकच आहेत का, यावर पेच कायम असून सरकारने दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले. अखेर, काल (02 सप्टेंबर) मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची सांगता झाली असून त्यांच्या सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेटिअर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा मराठवाड्यातील मराठा समाजाला होणार आहे.

मराठा-कुणबी एकच की वेगळे? पेच कायम

सरकारने गॅझेटिअर लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी, मराठा आणि कुणबी एकच जात आहेत का? या प्रश्नावर पेच कायम आहे. यासाठी शासनाने दोन महिन्यांचा अवधी घेतला आहे. अभ्यासकांचे म्हणणे आहे की शासनाने १९३१ च्या गॅझेटिअरऐवजी १८८४ च्या गॅझेटिअरचा आधार घ्यावा.

अभ्यासकांचा ठाम दावा

अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, हा पेच फक्त चुकीच्या माहितीमुळे निर्माण झाला आहे. त्यांच्यानुसार मराठवाड्यात मराठा आणि कुणबी हे एकच आहेत आणि ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहेत.त्यांनी नुकतीच मुंबईत मनोज जरांगे यांची भेट घेऊन गॅझेटिअरची माहिती सादर केली.

गॅझेटिअरमधील नोंदी

‘निझाम डॉमिनियन्स गॅझेटिअर ऑफ औरंगाबाद डिस्ट्रीक्ट’नुसार, या परिसरात जवळपास ४० टक्के लोकसंख्या कुणबी जातीची होती. मात्र, मराठा जातीची स्वतंत्र नोंद नव्हती. स्वातंत्र्यानंतर मात्र प्रशासन म्हणू लागले की, येथे कुणबी नाहीत; सर्वच मराठे आहेत.

वादग्रस्त प्रश्न

डॉ. सूर्यवंशी यांनी सवाल केला की, स्वातंत्र्यापूर्वी असलेले कुणबी गेले कुठे आणि मराठे आले कधी? याबाबत शासनाकडे स्थलांतराची नोंद आहे का? तसेच, जर मराठा आणि कुणबी या वेगळ्या जात असतील तर शासनाने आतापर्यंत त्यांच्या विवाहांना आंतरजातीय विवाह मानून निधी का दिला? असा सवाल सूर्यवंशी यांनी मटासोबत बोलताना उपस्थितीत केला. 

अन्यायकारक वंचना

सूर्यवंशी यांनी ठामपणे म्हटले की, मराठा आणि कुणबी जाती एकच असल्याचे पुरावे आहेत.तरीदेखील मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवणे हा अन्याय आहे. शासनाकडे या संदर्भात समाजशास्त्रीय अभ्यास उपलब्ध नसताना, या पेचाचा निकाल लांबवणे योग्य ठरणार नाही.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या

  • मराठा-कुणबी एक आहेत, याची अंमलबजावणी व्हावी.
  • हैदराबाद गॅझेटियर लागू करावा, तसेच सातारा आणि बॉम्बे गॅझेटियरही लागू करावेत.
  • ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे-सोयरे देखील पोटजातीमध्ये धरावेत.
  • मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत.
  • समाजाला कायद्यात बसणारं आरक्षण द्यावं.