Manoj Jaranage Patil : मनोज जरांगे यांनी 30 मेपासून आंतरवाली सराटीत कडक उन्हात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाने शांतता राखावी आणि आंदोलनस्थळी गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 30 मेपासून आंतरवाली सराटी येथे रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. सरकारला गेल्या दहा महिन्यांपासून वेळ दिला, मात्र सातारा गॅझेटिअर संदर्भात अद्याप जीआर काढण्यात आलेला नाही, असा आरोप करत जरांगे यांनी “मला चर्चा नको, आरक्षणाची अंमलबजावणी हवी,” अशी ठाम भूमिका मांडली.

रखरखत्या उन्हात उपोषणाचा निर्धार
मनोज जरांगे यांनी सांगितले की, सरकारला मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तब्बल दहा महिने वेळ देण्यात आला होता. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने आता कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. यापूर्वीची उपोषणे मंडप, सावली आणि फॅनमध्ये केली जात होती, मात्र आता अंतिम टोकाचा निर्णय घेत उन्हातच उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“ना पाणी, ना अन्न आणि पायात चप्पलही घालणार नाही,” असे सांगत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. हे उपोषण कुठेही होऊ शकते, जंगलात किंवा मोकळ्या रानातही करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले.
‘समाजाच्या लेकरांसाठी प्राण देण्यास तयार’
जरांगे यांनी आपल्या प्रकृतीबाबत बोलताना शरीरात प्रचंड वेदना होत असल्याचे सांगितले. “माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झाला आहे, त्यामुळे स्वतःच्या वेदनांचा विचार करणार नाही,” असे ते म्हणाले. उष्माघातामुळे काही झाले तर त्याला सरकार आणि Devendra Fadnavis जबाबदार असतील, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
सरकारवर दुटप्पी भूमिकेचा आरोप
मराठा समाजाची मतं हवीत, पण त्यांच्या मुलांना आरक्षण द्यायचं नाही, अशी सरकारची भूमिका असल्याची टीका जरांगे यांनी केली. हैदराबाद गॅझेटिअरप्रमाणे प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी देणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सातारा गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला होता, मात्र दहा महिने उलटूनही जीआर काढण्यात आलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. तसेच मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासाठी इतका वेळ का लागत आहे, असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला.
‘आमचा पाच पिढ्यांचा बॅकलॉग कोण भरून काढणार?’
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या पाच पिढ्यांचा बॅकलॉग भरून काढणार कोण, असा सवाल उपस्थित केला. “आता आरपारची लढाई आहे. समाजासाठी वेळ आली तर प्राणही देण्यास तयार आहे,” असे ते म्हणाले. राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी “इतकं क्रूर सरकार यापूर्वी पाहिलं नाही,” असेही म्हटले.
मराठा समाजाला शांततेचे आवाहन
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने आंतरवाली सराटीत गर्दी करू नये आणि राज्यात कुठेही उद्रेक किंवा धिंगाणा घालू नये, असे आवाहन जरांगे यांनी केले. “आम्हाला चर्चा नको, अंमलबजावणी हवी,” असे पुन्हा स्पष्ट करत त्यांनी आंदोलन शांततेत करण्यावर भर दिला.
भाजप नेत्यांवरही टीका
जरांगे यांनी काही भाजप नेत्यांवरही निशाणा साधला. Prasad Lad, Narayan Rane, Nitin Gadkari आणि इतर नेत्यांचा उल्लेख करत त्यांनी सरकारमध्ये अंतर्गत राजकारण सुरू असल्याची टीका केली. काही मंत्री आणि नेत्यांचा फक्त राजकीय वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.


