महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी हनुमान मंदिरात शनिवारी मोठी दुर्घटना घडली. मंदिराचं बांधकाम सुरू असलेलं छत कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला.
Maharashtra Accident News : शनिवारी दुपारी महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात एक मोठी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. यशवाडी गावातील हनुमान मंदिरात बांधकाम सुरू असलेलं छत भाविकांच्या अंगावर कोसळलं. बघता बघता, अवघ्या १४ सेकंदात ७ जणांचा मृत्यू झाला आणि २५ ते ३० जण जखमी झाले. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, कोणाला काही समजायच्या आतच होत्याचं नव्हतं झालं. काही क्षणांतच छत खाली आलं आणि लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले.

यशवाडीच्या हनुमान मंदिरात नेमकं काय घडलं?
ही दुर्घटना मंदिरासमोर बांधल्या जाणाऱ्या सभामंडपात झाली. तिथे छताच्या स्लॅबचं काम सुरू होतं. यासाठी बांबू आणि लोखंडी सळ्या वापरून सेंट्रिंगचं स्ट्रक्चर उभं केलं होतं. पण अचानक हेच छत खाली उभ्या असलेल्या भाविकांच्या अंगावर कोसळलं. बचावकार्यादरम्यान आतापर्यंत ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पण मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, कारण ढिगाऱ्याखाली आणखी काही जण दबले असण्याची शक्यता आहे. जखमींपैकी १५ ते २० जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
मंदिरात दर्शन घेतानाच काळाने गाठलं?
या दुर्घटनेचा जो व्हिडिओ समोर आला आहे, तो पाहून अपघाताची भीषणता लक्षात येते. व्हिडिओनुसार, ही घटना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. शनिवार असल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी आणि पूजेसाठी मोठी गर्दी झाली होती. सगळे भक्त रांगेत उभे राहून दर्शन आणि प्रसाद घेत होते. त्याचवेळी बांबू आणि लोखंडी सळ्यांनी बनवलेलं सेंट्रिंगचं स्ट्रक्चर तुटलं. त्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरडा सुरू झाला. काही जणांनी कसाबसा आपला जीव वाचवला, पण अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.


