CNG Price in Maharashtra : पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आता पुणे आणि नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. नैसर्गिक वायूच्या वाढलेल्या इनपूट कॉस्टमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन दर सातत्याने वाढत असून सर्वसामान्य वाहनचालकांची चिंता वाढली आहे.
CNG Price in Maharashtra : राज्यात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे आधीच वाहनचालकांचे बजेट कोलमडले असताना आता सीएनजी वाहनधारकांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. पुण्यात गुरुवारी सकाळपासून सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता सीएनजीचा दर 94.85 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सर्व पेट्रोल पंपांवर हे नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे.

पुण्यात सीएनजी 95 रुपयांच्या उंबरठ्यावर
पुण्यात सीएनजीच्या दरात झालेल्या नव्या वाढीनंतर प्रतिकिलो दर 94.85 रुपयांवर गेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सीएनजी हा पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त पर्याय मानला जात होता. त्यामुळे अनेक नागरिकांनी सीएनजी वाहनांकडे मोर्चा वळवला होता. मात्र आता सीएनजीचे दरही सातत्याने वाढत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः कॅब चालक, रिक्षाचालक आणि रोज मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या नागरिकांवर या दरवाढीचा थेट परिणाम होणार आहे.
नाशिकमध्येही सीएनजी महाग
पुण्यासोबतच नाशिकमध्येही सीएनजीच्या दरात एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मे महिन्यात सीएनजी दरवाढीची ही दुसरी वेळ आहे. याआधी 9 मे रोजी सीएनजीच्या दरात 1.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. नैसर्गिक वायूच्या इनपूट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कंपन्यांनी ही दरवाढ केल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्येही सीएनजी महागले होते. त्यानंतर महाराष्ट्रातही दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि ती आता खरी ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय संघर्षाचा इंधन दरांवर परिणाम
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक इंधन बाजारावर दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढल्यामुळे भारतातही पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या नव्या वाढीनंतर पेट्रोल 2.61 रुपयांनी तर डिझेल 2.17 रुपयांनी महागले आहे.
दहा दिवसांत पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी वाढ
15 मेपासून सुरू झालेल्या दरवाढीच्या मालिकेमुळे गेल्या दहा दिवसांत पेट्रोलच्या दरात एकूण 7 रुपये 38 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 7 रुपये 09 पैशांची वाढ नोंदवली गेली आहे. या सातत्यपूर्ण वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट कोलमडत असून वाहतूक आणि शेती क्षेत्रावरही त्याचा परिणाम जाणवत आहे.
काही जिल्ह्यांमध्ये इंधन तुटवडा
दरवाढीबरोबरच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये डिझेलचा तुटवडाही निर्माण झाला आहे. बुलढाणा, वाशिम आणि परभणी जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना डिझेलसाठी रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपांवर रांगा लावाव्या लागत आहेत. शेतीच्या हंगामात इंधनटंचाई निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.


