Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पुढील २४ तासांत राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Scroll to load tweet…

राज्यातील विविध विभागांमधील हवामानाचा अंदाज

मराठवाडा आणि पूर्व विदर्भ

'यलो अलर्ट' जारी असलेले जिल्हे: मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड तसेच पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या ९ जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.

इतर जिल्हे: बीड, परभणी आणि हिंगोलीमध्ये मध्यम स्वरूपाचा, तर जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हलका पाऊस होऊ शकतो.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र

कोकण: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून, येथे वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ

उत्तर महाराष्ट्र: धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पश्चिम विदर्भ: बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

मुंबई:

मुंबई शहर आणि उपनगरांत ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि पावसाच्या शक्यतेनुसार घराबाहेर पडावे.