केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी सकाळी पोलिसांच्या आपत्कालीन हेल्पलाइनवर फोन करून ही धमकी देण्यात आली होती.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी सकाळी ८:४६ वाजता एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांच्या आपत्कालीन हेल्पलाइनवर (११२) फोन करून ही धमकी दिली होती.
या फोनमुळे नागपूर पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. धमकी मिळाल्यानंतर तात्काळ प्रताप नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक तपासणी आणि माहितीच्या आधारावर आरोपीला अवघ्या काही तासांतच अटक केली. उमेश विष्णू राऊत (रा. तुळसी बाग रोड, महाल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी मेडिकल चौकाजवळील एका देशी दारूच्या दुकानात काम करतो. त्याने आपल्या मोबाइल फोनवरून फोन करून गडकरींच्या निवासस्थानी १० मिनिटांत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला नागपूरमधील बिमा दवाखान्याजवळून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९:०० वाजता हेल्पलाइनवर कॉल आला होता. यानंतर बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले आणि गडकरींच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही सतर्क करण्यात आले. मात्र, तपासणीत कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे हा कॉल एक खोटी धमकी असल्याचे सिद्ध झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. त्याने ही धमकी का दिली आणि त्याचा हेतू काय होता, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे गडकरींच्या निवासस्थानाची सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे.


