मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या मातोश्रींसोबत 'मेघदूत' बंगल्यात गृहप्रवेश केला. ५५ वर्षांपूर्वी त्यांचे बालपण याच बंगल्यात गेले होते. आईच्या वाढदिवशी हा बंगला मिळाल्याने ते भावूक झाले.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान सहकारी आणि मंत्री शंभूराज देसाई यांना त्यांच्या बालपणीच्या आठवणींनी आणि आईच्या प्रेमाने आज गहिवरून आले. 'मेघदूत' बंगल्याच्या गृहप्रवेशाच्या वेळी शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई यांना अश्रू आवरता आले नाहीत. या बंगल्याशी जोडलेल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे संपूर्ण देसाई कुटुंब भावूक झाले.
'मेघदूत' बंगल्याशी जुनं नातं
आज तब्बल 55 वर्षांनंतर शंभूराज देसाई यांनी त्यांच्या मातोश्री विजयादेवींसोबत 'मेघदूत' बंगल्यात गृहप्रवेश केला. या बंगल्यातच त्यांचा जन्म झाला आणि बालपणीची पहिली पाच वर्षे त्यांनी इथेच घालवली. त्यांचे आजोबा बाळासाहेब देसाई मंत्री झाल्यानंतर त्यांना हा बंगला मिळाला होता. आज त्याच बंगल्यात स्वतः मंत्री म्हणून पुन्हा प्रवेश करताना देसाई यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
आईच्या भावनांना मिळाला मोकळा वाव
शंभूराज देसाई यांच्या मातोश्री विजयादेवी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. "माझा जन्म या बंगल्यातला आहे. मला त्याला कलेक्टर करायचं होतं. पण तो आज कलेक्टरपेक्षा मोठा झाला, आमदार झाला, मंत्री झाला," असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. बाळासाहेब देसाईंच्या आठवणी काढताना त्या म्हणाल्या, "आम्हाला पावनगड बंगला मिळाला होता, पण मी नेहमी मेघदूत बंगला मिळेल का, असं विचारायची. आज माझ्या मुलाने माझी ती इच्छा पूर्ण केली आहे. आज त्यांचे वडील असते तर त्यांना खूप आनंद झाला असता."
चॉकलेट वाटण्याचा किस्सा आणि राजकीय प्रवास
शंभूराज देसाई यांनीही आईच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी शाळेत क्लास लीडर होण्यासाठी मुलांना चॉकलेट वाटल्याचा किस्सा सांगितला. तसेच, "देसाई घराण्याचं नाव टिकवण्यासाठी माझ्या आईने पराभव समोर दिसत असतानाही राजकारणात प्रवेश केला," असे सांगत त्यांनी आईच्या त्याग आणि धैर्याचे कौतुक केले.
मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले. "आज माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी त्यांनी आम्हाला हा 'मेघदूत' बंगला दिला. लहानपणापासून या बंगल्याशी अनेक आठवणी जोडल्या आहेत. मी एकदाच मुख्यमंत्र्यांकडे या बंगल्याची विनंती केली आणि त्यांनी ती लगेच मान्य केली," असे ते म्हणाले. आपल्या आजोबा बाळासाहेब देसाई यांच्याप्रमाणेच लोककल्याणाचे काम करण्याची त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर राजकारणात प्रवेश करावा लागला आणि वयाच्या 20 व्या वर्षीच बिनविरोध सहकारी कारखान्याचा चेअरमन झालो, अशा जुन्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.


