सार
Raj Thacekray on Pune Porsche car Accident case: तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार, पोलीस, कोर्ट की सरकारवर असा सवाल राज यांनी उपस्थित केला. जनतेचा विश्वासच उडाला तर आराजकाकडेच जाणार, असा इशाराही राज यांनी दिला.
Raj Thacekray on Pune Porsche car Accident case: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावर मनसे नेते राज ठाकरे यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला भीषण अपघाताची शिक्षा म्हणून निबंध लिहिण्यास सांगणे, हे पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय शक्यच नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अमेरिकेतील अधिवेशनाला राज ठाकरे उपस्थित होते. तेव्हा त्यांनी पुण्यातील पोर्शे अपघातावर भाष्य केले. अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे वेगवेगळ्या मुद्द्यांवर व्यक्त झाले.
‘जनतेचा विश्वासच उडाला तर आराजकाकडेच जाणार’, राज यांचा इशारा
पुण्याच्या अपघातात सर्वजण बिल्डरचा मुलगा, बिल्डर आणि त्याचा बाप, त्या अल्पवयीन मुलाची आई यांच्याबाबतच बोलत आहेत. त्या मुलाने ज्या दोन जणांना चिरडले त्या दोघांबाबत कोणच बोलत नाहीय. त्यांच्या आई वडिलांबाबत बोलत नाही. धक्कादायक म्हणजे ती केस कोर्टात गेल्यावर तेथील जज त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगतो. हा कोणता न्यायाधीश आहे. पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय अशा प्रकारची शिक्षा न्यायालयात होऊ शकत नाही. यानंतर तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार, पोलीस, कोर्ट की सरकारवर असा सवाल राज यांनी उपस्थित केला. जनतेचा विश्वासच उडाला तर आराजकाकडेच जाणार, असा इशाराही राज यांनी दिला.
अमेरिकेमध्ये कोणीही पोलिसांवर हात उचलू शकत नाही. महाराष्ट्रात कोणीही येतो आणि पोलिसांवर हात उचलतो. त्याला एक दिवस तुरुंगात ठेवले जाते, सोडले जाते. किती खाली जायचे याला काही मर्यादा आहे, असेही राज म्हणाले. मराठीवर बोलताना राज म्हणाले की, राज्यात किंवा राज्याबाहेर कुठेही, जगात दोन मराठी माणसे एकत्र आली की त्यांनी मराठीतच बोलावे. तरच मराठी समाज एकसंध राहिल. यासाठी इथे जन्मलेल्या प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न करायला हवेत, असा सल्लाही राज यांनी दिला.
आणखी वाचा :