Maharashtra Weather : उत्तर भारतात थंडीची लाट वाढली असून महाराष्ट्रातही पारा झपाट्याने घसरत आहे. विदर्भात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी धोकादायक झालीये. 

Maharashtra Weather : देशभरातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीने नागरिक हैराण झाले असून, पुढील काही दिवस तापमान आणखी घसरण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत. उत्तरेकडील थंडीचा परिणाम आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जाणवू लागला आहे.

उत्तर भारतात शीतलाटेचा इशारा

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आणि चंदीगड या भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये किमान तापमान सातत्याने घसरत असून, नागरिकांना कडाक्याच्या गारठ्याचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्रात थंडीचा जोर; विदर्भात गारठा वाढला

उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. गोंदियामध्ये यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून पारा थेट 7 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. धुळ्यात 8 अंश, तर नागपूरमध्ये 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने विदर्भात शीतलाटेचा इशारा दिला आहे.

पुण्यात पुन्हा थंडी वाढली

किमान तापमानात घट झाल्याने पुण्यात गारठा वाढला आहे. गेल्या तीन दिवसांत किमान तापमान वाढल्याने थंडी काहीशी ओसरली होती. मात्र मंगळवारी एका दिवसात तापमानात तब्बल 3 अंश सेल्सिअसने घसरण झाली. पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मुंबईसह अनेक शहरांत वाढलेले प्रदूषण चिंतेचा विषय

थंडी वाढत असतानाच मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरावर पोहोचली असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. प्रशासनाकडून प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात प्रदूषणात वाढच होताना दिसत आहे.

दक्षिण भारतात पावसाचा इशारा

हवामान विभागाने 8 आणि 9 जानेवारी रोजी तामिळनाडूमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच 9 आणि 10 जानेवारी रोजी तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मॉन्सून संपूनही देशातील काही भागांत पावसाचा जोर कायम असून, सततच्या पावसामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.