- Home
- Maharashtra
- Pune Railway Update : पुणेकरांसाठी गुड न्यूज! आता ट्रॅफिकचं टेन्शन विसरा; ६० नवीन लोकल धावणार, ६ नवीन प्लॅटफॉर्मचा मास्टर प्लॅन तयार!
Pune Railway Update : पुणेकरांसाठी गुड न्यूज! आता ट्रॅफिकचं टेन्शन विसरा; ६० नवीन लोकल धावणार, ६ नवीन प्लॅटफॉर्मचा मास्टर प्लॅन तयार!
Pune Railway Update : पुणे रेल्वे स्थानकाचा लवकरच मोठ्या प्रमाणावर कायापालट होणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी सहा नवीन फलाट आणि 60 नव्या रेल्वे गाड्यांची भर पडणार आहे. या मास्टर प्लॅनमुळे पुणे स्टेशनची क्षमता दुप्पट होईल.

पुणेकरांसाठी गुड न्यूज! आता ट्रॅफिकचं टेन्शन विसरा
पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे रेल्वे स्थानकाचा लवकरच मोठ्या प्रमाणावर कायापालट होणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी सहा नवीन फलाट आणि 60 नव्या रेल्वे गाड्यांची भर पडणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे प्रवाशांची गर्दी कमी होणार असून, पुणेकरांचा रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.
पुणे स्टेशनसाठी भव्य मास्टर प्लॅन
रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी एक सविस्तर मास्टर प्लॅन तयार केला आहे. या योजनेअंतर्गत सध्याच्या फलाटांची लांबी वाढवण्यात येणार असून, त्यासोबतच सहा नव्या फलाटांची उभारणी केली जाणार आहे. यामुळे पुणे स्थानकाची प्रवासी हाताळण्याची क्षमता जवळपास दुप्पट होणार आहे.
काय आहे ‘तो’ महत्त्वाचा प्लॅन?
सध्या पुणे स्थानकावरून 50 ओरिजनेटिंग रेल्वे गाड्या धावतात. मात्र पुढील पाच वर्षांत ही संख्या 60 ने वाढवून तब्बल 110 गाड्यांपर्यंत नेण्याचा रेल्वेचा मानस आहे. याशिवाय पुण्याहून धावणाऱ्या 75 रेल्वे गाड्यांना 198 अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत. यामुळे सुमारे 20 हजार अतिरिक्त प्रवाशांची सोय होणार आहे. नवीन 60 गाड्यांमुळे जवळपास दीड लाख प्रवाशांना थेट फायदा होणार असून, वेटिंग तिकिटांचे प्रमाण कमी होण्यासही मदत मिळणार आहे.
सॅटेलाइट स्टेशन आणि मेगा कोचिंग टर्मिनल
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील प्रमुख 48 रेल्वे स्थानकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून, त्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर या स्थानकांचा समावेश आहे. मात्र पुणे स्टेशन परिसरात जागेची मर्यादा असल्याने, रेल्वे प्रशासनाने दोन सॅटेलाइट रेल्वे स्थानके विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आळंदी, उरुळी आणि फुरसुंगी येथे मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहेत. यामुळे भविष्यात रेल्वे गाड्यांची संख्या वाढली तरी पुणे स्थानकावर अतिरिक्त ताण येणार नाही.
पुणे आणि परिसरालाही मोठा दिलासा
या मास्टर प्लॅनमुळे केवळ पुणे शहरच नव्हे, तर परिसरातील इतर रेल्वे स्थानकांवरही पुढील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात सुविधा वाढणार आहेत. गाड्या आणि डब्यांची संख्या वाढल्याने प्रवाशांची गैरसोय कमी होणार असून, पुणेकरांचा रेल्वे प्रवास अधिक आरामदायी आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.

