- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Update: सिंधुदुर्गसह 'या' जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल?
Maharashtra Weather Update: सिंधुदुर्गसह 'या' जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल?
Maharashtra Weather Update: मान्सून परतल्यानंतरही राज्यात पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले. हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा 'येलो अलर्ट' दिला. तर उत्तर महाराष्ट्र, मुंबईत हवामान कोरडे राहणार आहे.

महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट
मुंबई: राज्यात नैऋत्य मान्सूनची माघार झाल्यानंतर बर्याच भागांमध्ये कोरडं आणि शांत हवामान अनुभवायला मिळत आहे. मात्र, हवामान विभागाने पोषक हवामान तयार झाल्याची नोंद घेत काही जिल्ह्यांना पावसाचा 'येलो अलर्ट' दिला आहे.
Thunderstorm accompanied with lightning, light rainfall, gusty winds with speed reaching 30-40 Kmph very likely to occur at isolated places in the districts of South Konkan-Goa and South Madhya Maharashtra .
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 19, 2025
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि सांगली जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला 20 आणि 21 ऑक्टोबरसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याच दिवशी परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट लागू केला आहे. बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात 21 ऑक्टोबरपासून पावसाची पुनरागमन
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात स्वच्छ वातावरण होते. मात्र 21 ऑक्टोबरपासून या भागात पुन्हा पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान सर्व जिल्ह्यांत हलक्यापासून मध्यम पावसाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, 23 ऑक्टोबरसाठी संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात कोरडे हवामान, थंडी वाढण्याची शक्यता
उत्तर महाराष्ट्रात आगामी काही दिवसांत पावसाची शक्यता नाही. नाशिक व आजूबाजूच्या भागांमध्ये किमान तापमानात घट होत असल्यामुळे थंडीचे प्रमाण वाढण्याची चिन्हं दिसून येत आहेत.
मुंबईत कोरडं आणि स्वच्छ हवामान
राजधानी मुंबई व उपनगरांत 20 ऑक्टोबर रोजी आकाश स्वच्छ आणि निरभ्र राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35°C आणि किमान तापमान 25°C दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
राज्यभरातील बदलत्या हवामानाचा विचार करता, शेतकऱ्यांनी आपली शेतीकामे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने करावीत, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

