Mahavitaran Electricity Bill Hike: महावितरणने ऑक्टोबर महिन्याच्या वीजबिलात 'इंधन समायोजन शुल्क' (FAC) वाढवून ग्राहकांना धक्का दिला आहे. सप्टेंबरमध्ये महागड्या दराने वीज खरेदी केल्यामुळे ही दरवाढ लागू करण्यात आली.

मुंबई: दिवाळी म्हणजे घराघरात आनंदाचा प्रकाश, पण यंदा महावितरणने तोच प्रकाश महाग केला आहे! सणासुदीच्या काळात आनंदाचा उत्सव साजरा करत असताना वीज ग्राहकांच्या खिशावर मात्र महावितरणने अप्रत्यक्षपणे कात्री चालवली आहे. आता ऑक्टोबर महिन्याच्या वीजबिलात "इंधन समायोजन शुल्क" (Fuel Adjustment Charges – FAC) वाढवून वसूल केला जाणार आहे.

दिवाळीच्या तोंडावर ‘महावितरण’चा महागाईबाण!

सप्टेंबर महिन्यात विजेच्या वाढलेल्या मागणीमुळे महावितरणने खुल्या बाजारातून वीज महाग दराने खरेदी केली. याशिवाय उत्पादन खर्च अधिक असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागल्यामुळे एकूण खर्चात मोठी वाढ झाली. याची भरपाई करण्यासाठी आता सर्वच प्रकारच्या ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे.

कोण किती जास्त भरणार?

बीपीएल (गरीबी रेषेखालील) ग्राहक – प्रति युनिट 15 पैसे वाढ

1 ते 100 युनिट वापर – प्रति युनिट 35 पैसे

101 ते 300 युनिट – प्रति युनिट 65 पैसे

301 ते 500 युनिट – प्रति युनिट 85 पैसे

501 युनिटपेक्षा जास्त वापर – तब्बल 95 पैसे प्रतियुनिट वाढ

उदाहरणार्थ, जर एखाद्या घरात 100 युनिट वीज वापर झाली असेल, तर या वाढीमुळे साधारण 35 रुपये अधिक भरावे लागतील.

EV चार्जिंग स्टेशनवरही परिणाम

हा अतिरिक्त भार केवळ घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांपुरता मर्यादित नाही. ईव्ही चार्जिंग स्टेशन्सवरही प्रति युनिट 45 पैसे इंधन समायोजन शुल्क आकारले जात आहे, त्यामुळे ईव्ही वापरकर्त्यांनाही झळ बसणार आहे.

ही दरवाढ कायमस्वरूपी आहे का?

महावितरणच्या म्हणण्यानुसार, ही दरवाढ केवळ सप्टेंबरच्या विजेच्या वापरावर आधारित आहे आणि ऑक्टोबरच्या बिलातच लागू होईल. मात्र, विजेची मागणी अशीच वाढत राहिली, तर पुढील काही महिन्यांमध्ये अशा स्वरूपात दरवाढ पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिवाळीचा सण म्हटला की घराघरात प्रकाश, पण यंदा तोच प्रकाश महागात पडणार आहे. वाढत्या महागाईच्या झळा ग्राहकांना आधीच बसत असताना आता वीजबिलातील वाढ हा आणखी एक आर्थिक भार ठरणार आहे.