Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी ‘हॉटेल पॉलिटिक्स’, धाकधुक वाढली

| Published : Jul 11 2024, 10:42 AM IST / Updated: Jul 11 2024, 10:45 AM IST

vidhan bhavan

सार

Vidhan Parishad Election 2024 : या विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. त्यामुळे यात विजय मिळावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

Vidhan Parishad Election 2024 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्यासाठी सर्व पक्षांच्या त्यांच्या आमदारांना विविध पंचतारांकित हॉटेलमधील ठेवले आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. त्यामुळे यात विजय मिळावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

प्रेसिडेंट हॉटेलमध्ये भाजपचे आमदार 

विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या सर्व आमदारांना कुलाबा परिसरातील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये ठेवले आहे. बुधवारी रात्री विधिमंडळात भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर या आमदारांना हॉटेल प्रेसिडेंटमध्ये ठेवण्यात आले आहे. बुधवारी आणि गुरुवारी अशा दोन्हीही दिवस सर्व आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या आमदारांची रंगीत तालीम घेण्यात आली. भाजपाच्या आमदारांनी कोणत्या पसंतीचे कशी मते द्यावीत याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या आहेत. शिवाय, कोणाचे मतदान वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही वरिष्ठांकडून सर्व आमदारांना देण्यात आल्या.

ठाकरे गटाचे नियोजन काय?

आगामी निवडणुकीत ठाकरे गटाकडून आमदारांची विशेष काळजी घेतली जात आहे. ठाकरे गटाने त्यांच्या सर्व आमदारांना आयटीसी ग्रँड सेंट्रलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सर्व आमदारांना खेळीमेळीच्या वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेही आमदारांसोबत राहणार आहेत. तसेच या सर्व आमदारांच्या राहण्याची व्यवस्था एकाच मजल्यावर करण्यात आली आहे.

आयटीसी ग्रँड सेंट्रल या हॉटेलमध्ये ठाकरे गटाचे आमदार

सध्या आयटीसी ग्रँड सेंट्रल या हॉटेलमध्ये अजय चौधरी, वैभव नाईक, उदयसिंग राजपूत, राजन साळवी, प्रकाश फातर्फेकर, राहुल पाटील, सुनील प्रभू, सुनील राऊत, संजय पोतनीस, आदित्य ठाकरे, रमेश कोरगावकर हे आमदार उपस्थित आहेत. तर कैलास पाटील, नितीन देशमुख, शंकरराव गडाख आणि भास्कर जाधव हे चार आमदार गुरुवारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणाचे किती उमेदवार रिंगणात?

विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने नऊ उमेदवार उभे केले आहेत. विरोधी महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. पाच उमेदवारांसह भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला आहे. शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

पक्षीय बलाबल काय?

महायुतीमध्ये भाजपचे 103, शिवसेनेचे 40 आणि राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत. महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) 1 आमदार, बहुजन विकास आघाडी 2 आमदार असलेल्या एनडीएचा भाग आहे. प्रहार जनशक्ती पक्ष 1, इतरांसह, महायुतीचा वाटा 203 वर आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेस (37), शिवसेना ठाकरे गट (16), राष्ट्रवादी शरद पवार गट (12), समाजवादी पक्ष (2), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (1) आणि शेतकरी आणि कामगार पक्ष अशा 69 आमदारांचा पाठिंबा आहे. विधानपरिषदेच्या 11 सदस्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे, त्या जागा भरण्यासाठी निवडणूक आवश्यक आहे.

आणखी वाचा :

Maratha Reservation News : मराठा आरक्षणावरील सुनावणी ऑगस्टपर्यंत तहकूब, आयोगाला 3 आठवडे मुदतवाढ