'लाडकी बहीण योजने'वरुन शरद पवारांची टीका, राज्याची सांगितली आर्थिक परिस्थिती

| Published : Jul 17 2024, 04:17 PM IST / Updated: Jul 17 2024, 04:20 PM IST

sharad pawar rally

सार

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांवर भाष्य केले.

पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी योजनेवरुन विरोधकांकडून राज्य सरकारला चांगलंच ट्रोल केले जात आहे. दुसरीकडे या योजनेचे गावोगावी स्वागत होत असून महिलांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही राज्य सरकारच्यावतीने केले जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही आपल्या प्रत्येक भाषणात, कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करताना महिलांना या योजनेतून आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न असल्याचंही बोलले जाते. या योजनेवरुन विरोधकांनी टीकाही केली आहे. लाडक्या भावांचे काय, अस सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला होता. आता शरद पवार यांनीही लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले आहे.

शरद पवार यांनी विविध विषयांवर दिली प्रतिक्रिया

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि संस्थापक शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांवर भाष्य केले. त्यामध्ये विधानपरिषद निवडणुकीतील पराभव, भुजबळांची भेट, राज ठाकरेंचे ट्विट यांसह विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी कर्नाटक सरकारने नोकरीत 80 टक्के आरक्षण भूमिपुत्रांना देण्याचा निर्णय घेतला व राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर कर्नाटक सरकारचा निर्णय कोर्टात टिकणार नाही, असे पवार यांनी म्हटले. तसेच लाडकी बहीण योजनेवर बोलताना राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले.

'लाडकी बहीण योजने'वरुन शरद पवारांची युती सरकारवर टीका

लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ.. हे यंदाच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आलंय. पण महाराष्ट्रात अजित पवार आणि जयंत पाटील यांना 6 ते 7 वेळा बजेट मांडायची संधी मिळाली. या 6 ते 7 वेळेत बहीण भाऊ कुठेही आलेले दिसले नाहीत. बहीण भावांचा विचार होतोय याचा आनंद आहे. मात्र हा सगळा चमत्कार लोकसभा निकालातील मतदारांच्या मतांचा आहे, असे म्हणत शरद पवारांनी महायुती सरकारला पवारस्टाईल टोला लगावला. मतदारांनी मतं व्यवस्थित दिली तर बहीण-भाऊ सर्वांची अडचण होते. मलाच एकच काळजी आहे, ती म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे.

महाराष्ट्रावर अंदाजे 60 लाख कोटींचे कर्ज

महाराष्ट्र हा देशातील 2 ते 3 क्रमांकावरील राज्य होते, मात्र नियोजन मंडळाने काही दिवसांपूर्वी यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये, महाराष्ट्र 11 व्या क्रमांकाचे राज्य आहे, हे चिंता करण्याचे चित्र आहे. सध्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे, अंदाजे 60 लाख 80 हजार कोटींचे कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. यावर्षीचे आत्ताचे कर्ज 1 लाख 10 हजार कोटींचे कर्ज हे वेगळे आहे, अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

आणखी वाचा : 

महिलांसाठी आनंदाची बातमी, लाडकी बहीण योजनेचे या दिवशी खात्यात पैसे येणार