राज्यात ठिकठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच येत्या 8 जुलैपर्यंत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. याशिवाय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागातून पावसाचा आढावा घेतला. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करू नये असे आवाहन केले आहे. याशिवाय एकूणच राज्यातील सध्याची परिस्थिती कशी आहे याचे अपडेट्सही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

नाशिकला अलर्ट, ढगफुटीची शक्यता 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या (07 जुलै) नाशिकला अलर्ट देण्यात आल्याची माहिती दिली आहे. या ठिकाणी ढगफुटीची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ३०० मिमीपर्यंतच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय ठिकठिकाणी NDRF, SDRF ची पथके तैनात करण्यात आली आहेत.

मुंबई- पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाऊस

मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यासोबत अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तेथे दरड दूर करण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. काही प्रमाणात जीवितहानी देखील झाली आहे. तर कशेडी घाटात डोंगरच खाली आल्याची घटना घडली आहे. 

YouTube video player

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी 
राज्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सावित्रीसह ४ नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली आहे. यासोबत इंद्रायणीवरील ४ पूल पाण्याखाली गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

८ जुलैपर्यंत अलर्ट

हवामान खात्याकडून राज्यात पावसासाठी 8 जुलैपर्यंत अलर्ट जारी केला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचा पालघर जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगडमध्येही सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत दुपारी ३ नंतर हायहाइटची स्थिती समुद्रात निर्माण होणार आहे. काही ठिकाणची मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे. पण लोकलची सेवा मंद गतीने सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. 

Scroll to load tweet…