Mumbai Raigad Heavy Rainfall : मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच या भागात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. 

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. वसई-विरार, नालासोपारा परिसरात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेक घरं, दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. नुकतंच हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. तसंच ५० ते ६० किमी ताशी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही मुंबईकरांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन केलं आहे. शिवाय समुद्रकिनारी न जाण्याचंही त्यांनी मुंबईकरांना आवाहन करताना सांगितलं आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट

आज सकाळपासून रायगडमध्ये संततधार पाऊस आहे. अंबानदीने इशारा पातळी ओलांडली आहे. इतर सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली आहेत. आज रायगडमध्ये मुसळधार पावसासह हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रेड अलर्ट आहे. मुसळधार पावसात दरड कोसळण्याचाही धोका निर्माण होतो. आज रविवारी सकाळी आंबेनळी घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र तिथे तात्काळ दरड दूर करण्याचं काम करण्यात आलं. त्यानंतर आता वाहतूक सुरू झाली आहे.

YouTube video player

दरड, पूर स्थितीबाबत सतर्क राहण्याचं नागरिकांना आवाहन

दरडप्रवण क्षेत्रात, ३९२ गावांमध्ये पालक अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडून गावातील लोकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. २२५ गावांमध्ये ऑडिओ अलर्ट यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. मुसळधार पावसात एखाद्या दरडप्रवण क्षेत्रातील गावात दरड कोसळण्याचा धोका असल्यास नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पूर आणि दरड कोसळणे अशा धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावं, अशी माहिती रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. तसंच मुसळधार पावसात शाळांबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेतला जाईल, अशी माहितीदेखील किशन जावळे यांनी दिली आहे.