मराठा आरक्षणासाठी जरांगेंची पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली, असा असेल मार्ग

| Published : Aug 06 2024, 07:17 PM IST / Updated: Aug 06 2024, 07:19 PM IST

manoj jarange patil
मराठा आरक्षणासाठी जरांगेंची पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली, असा असेल मार्ग
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात सुरू होत आहे. सोलापुरात सुरुवात होऊन ही रॅली नाशिकमध्ये संपणार आहे. या रॅलीमध्ये मराठा समाजाचा मोठा सहभाग अपेक्षित आहे.

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीतील दुसऱ्या टप्प्याला 7 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातून त्यांनी शांतता रॅलीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात केली होती. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांचा दौरा करत छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी रॅलीची सांगता केली. त्यानंतर पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी ते अंतरवाली सराटीत बसले होते. मात्र शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा करत त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. आता पुन्हा एकदा त्यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची वाट धरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातून त्यांची यात्रा जाणार असून सोलापुरात सुरुवात आणि नाशिकमध्ये यात्रेची सांगता होणार आहे.

मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीसाठी सोलापूरकर सज्ज

मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीसाठी सोलापूरकर सज्ज झाले असून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातून मराठा बांधव बुधवारी सोलापुरात एकत्र येणार आहेत. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे यांच्या उपस्थितीत मोठी सभा होणार आहे. शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला बुधवारपासून सुरुवात होत असून 13 ऑगस्ट रोजी नाशिक येथे शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट असा 7 दिवसांचा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा असणार आहे. मनोज जरांगे यांच्या मराठवाड्यातील शांतता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता पश्चिम महाराष्ट्रातही शांतता रॅलीसाठी सकल मराठा समाज पुढाकार घेऊन कामाला लागल्याचे दिसून येत आहे. नुकतेच मनोज जरांगे पाटील सोलापूरसाठी अंतरवाली सराटीमधून रवाना झाले असून मंगळवारी त्यांचा तुळजापूर येथे मुक्काम असणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत आरक्षण हा महत्त्वाचा फॅक्टर ठरणार

राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची शांतता रॅली निघत आहे, दुसरीकडे मनसे नेते राज ठाकरे हेही महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तर आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दौरा करत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळीच राजकीय मंडळी कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात यंदाच्या निवडणुकीत आरक्षण हा महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे.

असा असणार शांतता रॅलीचा मार्ग

7 ऑगस्ट - सोलापूर

8 ऑगस्ट - सांगली

9 ऑगस्ट -कोल्हापूर

10 ऑगस्ट - सातारा

11 ऑगस्ट - पुणे

12 ऑगस्ट -अहिल्यादेवी नगर (अहमदनगर)

13 ऑगस्ट - नाशिक

आणखी वाचा : 

ओबीसींनी मनोज जरांगेंचा फोटो घरात लावावा, आंबेडकरांचा जरांगेंना उपरोधात्मक टोला