Maharashtra : राज्यात वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी सरकारने जंगलात बिबट्यांसाठी शेळ्या-बकऱ्या सोडण्याची योजना सुरू केली आहे. बिबट्यांना गावात भक्ष्याच्या शोधात येऊ नये यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे. 

Maharashtra : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये बिबट्यांचे मानवी वस्तीत हल्ले वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने बिबट्यांनी अन्नाच्या शोधात जंगलाबाहेर येऊ नये यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जंगलातच बिबट्यांसाठी शेळ्या किंवा बकऱ्या सोडण्याच्या प्रस्तावावर काम सुरू असून, काही ठिकाणी याची अंमलबजावणीही झाली आहे. याबाबतची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी नागपूरमध्ये दिली.

जंगलात भक्ष्याची कमतरता; बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ

गणेश नाईक म्हणाले की, बिबट्यांना जंगलात पुरेसे भक्ष्य उपलब्ध नसल्याने ते गावांमध्ये भक्ष्याच्या शोधात येतात. त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण होतो. “प्रत्येक जिल्ह्यात टॅग लावलेल्या शेळ्या-बकऱ्या जंगलात सोडण्याचा आमचा विचार आहे. जसा प्रत्येक गावात एक नंदी असतो, तशी ही जनावरे बिबट्यांसाठी उपलब्ध राहतील,” असे त्यांनी सांगितले. काही भागांमध्ये वनखात्याने या शेळ्या सोडून त्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

ऊसाच्या फडात वाढते वास्तव्य

नाईक म्हणाले की, आज बिबट्या हा जंगलातील कमी आणि ऊसाच्या फडात अधिक आढळणारा प्राणी झाला आहे. त्यामुळे त्यांचे वास्तव्य आणि संख्या मोठ्या प्रमाणात बदलत आहे. बिबट्याचा सध्या शेड्यूल-1 मध्ये समावेश आहे; परंतु त्याला शेड्यूल-2 मध्ये हलवावे, यासाठी केंद्रीय वनखात्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. “बिबटे आता जंगलातच राहत नसतील तर त्यांना वन्यजीव म्हणून गणू नये,” असे ते म्हणाले. याचबरोबर काही प्रमाणात बिबट्यांची नसबंदी करण्यास परवानगीही राज्याला मिळाली आहे.

जंगलात बिबट्यांची संतुलित संख्या राखण्याचे प्रयत्न

राज्य सरकारकडून प्रत्येक जंगलात बिबट्यांची संतुलित संख्या राहावी यासाठी नियोजन केले जात आहे. बिबट्यांना गावात येण्यापासून रोखण्यासाठी जंगलात भक्ष्य उपलब्ध करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जुन्नर, आंबेगाव आणि शिरुर तालुक्यात या प्रस्तावावर पायलट उपक्रम सुरू झाला आहे.

महाराष्ट्रातील बिबटे आफ्रिकेला पाठवण्याच्या प्रस्तावाची चर्चा

वनमंत्री यांनी आणखी एक धक्कादायक माहिती देत सांगितले की ज्या भागांमध्ये बिबट्यांची संख्या अधिक आहे, तेथील काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याबद्दलही विचार सुरू आहे. आफ्रिकेत वाघ, सिंह आहेत, परंतु बिबटे नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील बिबटे तिकडे पाठवण्याबाबत केंद्रीय सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू आहे. तसेच काही बिबटे वनतारा प्रकल्पातही स्थलांतरित केले जाणार आहेत.