- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर, २५ ऑगस्टसाठी ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर, २५ ऑगस्टसाठी ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात २५ ऑगस्ट रोजी पावसाचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, ११ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला.

मुंबई : महाराष्ट्रात हवामानाने पुन्हा एकदा आपला अंदाज बदलला असून, २५ ऑगस्ट रोजी राज्यात पावसाचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची तीव्रता कमी झालेली दिसत आहे. काही भागांमध्ये ऊन आणि सावली यांचा खेळ सुरू आहे, तर काही ठिकाणी हलक्याफुलक्या सरी पडताना दिसत आहेत. मात्र २५ ऑगस्टपासून कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Moderate rainfall very likely to occur at most places in the districts of South Konkan-Goa.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/nRPzeHbKvL— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 24, 2025
कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये धो-धो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे या भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ढगांचा गडगडाट आणि हलक्या सरी
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्यापावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये ढगांचा गडगडाट आणि हलक्यापासून मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूरमध्ये विजा आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रालाही अलर्टचा इशारा
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः नाशिक घाटमाथा व अहिल्यानगर भागात हलक्या सरींसह गडगडाट होण्याची शक्यता आहे.
सावध रहा!
राज्यभरात हवामानात होणाऱ्या बदलामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. विशेषतः ज्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आले आहे, तिथे अनावश्यक प्रवास टाळणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

