सार

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शिखर बँक घोटाळ्यासंदर्भात क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयात सादर केला. या रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी तथा बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना क्लिन चिट दिली आहे.

शिखर बँकेत कोणताही घोटाळा झालेले नाही.तसेच शिखर बँकेचं कोणतही नुकसान झाले नसल्याचं मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेनं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. राज्य सहकारी बँकेत (एमएसीबी) कथित 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आला होता. मात्र आता निवडणुकीआधीच अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.

साखर कारखान्यांसह इतर संस्थांना कर्ज देताना शिखर बँकेचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसल्याचं पोलिसांनी चौकशी अहवालावरून म्हटलं आहे. शिखर बँकेकडून सहकारी साखर कारखाने, सुतगिरण्या आणि राज्यातील इतर सहकारी संस्थांना हजारो कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आलं होतं. त्यामध्ये घोटाळा झाल्याचे आरोप झाले होते. सहकार आयुक्तांनी शिखर बँकेची चौकशी करण्याकरिता माजी न्यायाधीशांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार शिखर बँकेत कोणतेही चुकीचे कृत्य झाले नसल्याचं मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं म्हटलं आहे.

दोनवेळा तपास करून क्लोजर रिपोर्ट-

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (EOW) क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायाधीशांकडे सादर केला. पोलिसांनी काही साक्षीदारांसह बँकेच्या अधिकाऱ्यांचे जबाब पाहिले. तसेच काही कागदपत्रांची पडताळणी करून क्लोजर रिपोर्ट सादर केला. दोनवेळा तपास करूनही काहीही आढळले नसल्यानं क्लोझर रिपोर्ट देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

25 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप-

शिखर बँकेतील अनियमिततेमुळे 1 जानेवारी 2007 ते 31 डिसेंबर 2017 पर्यंत बँकेचे 25 हजार कोटींचे नुकसान झाल्याचं आरोपपत्रात म्हटलं होतं. साखर कारखान्यांना कर्जवाटप करताना बँकिंगसह आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन. कमी व्याजदरात कर्जवाटप करणे आणि मालमत्ता कमी दरात विकणे याचा आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला होता.

शरद पवारांसह 70 जणांवर गुन्हा दाखल -

महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँक घोटाळ्याप्रकरणी ‘सक्तवसुली संचलनालया’ने (ईडीने) राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत 70 जणांवर गुन्हा दाखल केला होता.