Maharashtra : दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम अडचणीत सापडले आहेत. याशिवाय ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी जोरदार हल्ला चढवला.
Maharashtra : मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अनिल परब म्हणाले, “रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी 1993 साली स्वतःला जाळून घेतले. मात्र तिने स्वतःला जाळलं की तिला जाळलं, हे समोर यायला हवं. यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट व्हायला हवी. जर ती शक्य नसेल तर त्यांचे पुत्र आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाची चौकशी करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
“दसरा मेळाव्यात नीचपणा केला”
रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावत परब म्हणाले, *“बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला तेव्हा मी विभाग प्रमुख होतो आणि 24 तास तिथे उपस्थित होतो. कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवता येतो का? हे समजण्याइतकीही अक्कल कदमांकडे नाही का? त्यांनी केलेला दावा 100 टक्के खोटा आहे.”
"उद्धव वाईट होते तर मंत्रीपद का घेतलं?"
परब यांनी सवाल केला, “बाळासाहेब 2012 ला गेले, पण कदमांना कंठ 14 वर्षांनी फुटला. 2014 मध्ये उद्धव ठाकरेंनीच त्यांना मंत्री केलं. मग एवढेच वाईट होते तर मंत्रीपद का स्वीकारलं? गेली 12 वर्षं त्यांनी तोंड का उघडलं नाही?”
जमीन बळकावणे, डान्सबार, दादागिरीचे आरोप
अनिल परब यांनी कदमांवर गंभीर आरोप करताना सांगितलं की, “रामदास कदम यांनी लोकांच्या जमिनी खाल्ल्या, डान्सबार चालवले, वाळूचोरी केली, दादागिरी केली. कोणाकोणाला घराबाहेर काढलं, हे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली, पण ती का केली? हेही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी चौकशीत आणावं,” अशी मागणी त्यांनी केली.
वाद आणखी चिघळणार
या आरोप-प्रत्यारोपांमुळे ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अनिल परब यांनी पुरावे अधिवेशनात मांडण्याचा इशारा दिल्याने पुढचे काही दिवस राजकीय तापमान आणखी वाढण्याची चिन्हं आहेत.


