सार
महाळंगी येथे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्याचा तडाखा संपूर्ण गावास बसला. वीज पडून 2 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून गावात अनेकांच्या घरावरील पत्रेही उडाली असल्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
चाकूर: तालुक्यातील महाळंगी येथे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्याचा तडाखा संपूर्ण गावास बसला. विजेच्या ट्रान्सफार्मसह झाडे उन्मळून पडली. वीज पडून 2 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. गावात अनेकांच्या घरावरील पत्रेही उडाली. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
शिवाजी नारायण गोमचाळे (३०) व ओमकार लक्ष्मण शिंदे (३५) असे मयत दोघा शेतकऱ्यांची नावे आहेत. रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास महाळंगी येथे जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. शिवाजी नारायण गोमचाळे व ओमकार लक्ष्मण शिंदे हे शेतकरी शेतात काम करीत होते. तेव्हा वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
प्रचंड मोठ्या प्रमाणावर आलेल्या वादळी वाऱ्याचा तडाखा संपूर्ण गावास बसला आहे. त्यामुळे विद्युत खांब जमीनदोस्त झाले. त्याचबरोबर विजेचे ट्रान्सफार्मरही पडले. शिवाय, अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. यात एक ऑटो, ट्रॅक्टरचेही नुकसान झाले असून अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. अनेकांच्या घरावरील वाऱ्याने उडाली आहे. त्यात जवळपास २० ते २५ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जानवळ आरोग्य केंद्रात शवविच्छेदन
वीज पडून शिवाजी गोमचाळे, ओमकार शिंदे या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचे पार्थिव जानवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मयत शिवाजी गोमचाळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा तर ओमकार शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी व चार मुली असा परिवार आहे.
घर, वाहनांवर झाडे कोसळली
महाळंगीत वादळी वाऱ्याचा वेग भयानक होता. अनेक लोक वादळामुळे घाबरली होती. काही क्षणातच अनेकांच्या घरावरील पत्रेही उडाली. त्यात काहींचा आसरा गेला आहे. वादळी वारे आणि पावसात अनेकांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
२०० झाडे, १९ विद्युत पोल उखडले
महाळंगी शिवारात वादळी वाऱ्याचे जवळपास २०० हून अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने १९ विद्युत पोलही उखडले आहेत. तसेच दोन डीपीही पडले आहेत. त्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, गोठ्यात बांधण्यात आलेल्या जनावरांवर पत्रे पडून दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी अनुपमा निंबाळकर, तलाठी विष्णू वजीरे यांनी महाळंगी गावात भेट देऊन पाहणी केली. या घटनेत सुमारे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आणखी वाचा:
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार