Latur Panchayat Samiti Results : लातूर जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेने पहिला विजय नोंदवत खाते उघडले आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाव गटात मनसेचे डॉ. सुनील नागरगोजे विजयी झालेत. 

Latur Panchayat Samiti Results : लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांची घोषणा सुरू झाली असून मराठवाड्यातील राजकीय चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लातूर जिल्ह्यात आपले खाते उघडत पहिला महत्त्वाचा विजय नोंदवला आहे.

मनसेचा पहिला विजय; पानगाव गटात यश

रेणापूर तालुक्यातील पानगाव जिल्हा परिषद गटामध्ये मनसेचे उमेदवार **डॉ. सुनील नागरगोजे** यांनी विजय मिळवला आहे. तसेच पंचायत समिती स्तरावर कोस्ट गाव येथून श्रीदेवी गालफाडे आणि पानगाव येथून मोनिका रवी सूर्यवंशी** या मनसेच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. या निकालामुळे लातूर जिल्ह्यात मनसेला बळ मिळाले आहे.

मराठवाड्यात मिनी मंत्रालयावर कोणाची सत्ता?

छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंचायत समित्यांवर कोणाचा झेंडा फडकणार आणि जिल्हा परिषदेचा कारभार कुणाच्या हाती जाणार, याचा फैसला आज होणार आहे.

राजकीय वातावरण तापले; जोरदार प्रचार

नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांनंतर या निवडणुकांमुळे मराठवाड्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सर्व प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रचारसभांपासून डिजिटल माध्यमांवरील प्रचार, आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली.

६३.७९ टक्के मतदान; उमेदवारांची मोठी संख्या

७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या मतदानात लातूर जिल्ह्यातील ९ लाख ५१ हजार २३५ मतदारांनी, म्हणजेच ६३.७९ टक्के मतदान केले. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी २४२ उमेदवार, तर दहा पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

१४२ टेबलवर मतमोजणी; कडक पोलीस बंदोबस्त

लातूर जिल्ह्यात ईव्हीएम मतमोजणीसाठी एकूण १४२ टेबल्स लावण्यात आले आहेत.

  • लातूर – २०
  • अहमदपूर – १४
  • उदगीर – १४
  • निलंगा – २०
  • औसा – १८
  • रेणापूर – १६
  • देवणी – १२
  • शिरूर अनंतपाळ – ८
  • चाकूर – १०
  • जळकोट – १०

याशिवाय टपाली मतपत्रिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी १,२९१ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.