पुण्याच्या बावधन परिसरात एक भीषण अपघात झाला. यात एका १० वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडील आणि बहिणीसोबत दुचाकीवरून जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात वडील आणि मुलगी जखमी झाले असून, पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

पुण्याच्या बावधनमध्ये १७ एप्रिल रोजी एक दुर्दैवी अपघात घडला, ज्यात एका १० वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. हा मुलगा आपल्या वडील आणि बहिणीसोबत दुचाकीवरून जात होता, तेव्हा मागून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

अपघात नेमका कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप पाटोळे आपल्या दोन मुलांना क्लासला सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. ते VTV सर्कलजवळून जात असताना, जिथे दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच रस्त्यावर येते, तिथे मागून वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे ते तिघेही रस्त्यावर फेकले गेले. संदीप पाटोळे आणि त्यांच्या मुलीला दुखापत झाली, तर १० वर्षांच्या मुलाला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांचा तपास सुरू

बावधन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितलं की, या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू आहे. अपघात नेमका कसा घडला आणि यात ट्रक चालकाची काय भूमिका होती, याचा पोलीस तपास करत आहेत.