भाजपचे (BJP) राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिली आहे. राज्याच्या राजकारणातून बाजुला झालेले विनोद तावडे यांनी मात्र देशाच्या राजकारणात मोठी झेप घेतली आहे.चला जाणून घेऊ त्यांचा राजकीय प्रवास.
भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात शांतपणे काम करत संघटन मजबूत करणाऱ्या नेत्यांमध्ये आता विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर आहे. धैर्य, निष्ठा, संघटन कौशल्य आणि निवडणूक रणनीती यांचा प्रभावी मेळ साधणाऱ्या विनोद तावडे यांच्यावर आता भाजपने आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी 2027 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महासचिव आणि राज्यसभा खासदार विनोद तावडे यांची उत्तर प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रीय सचिव जगदीश ईश्वरभाई पटेल यांच्याकडे सहप्रभारीपद देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून राष्ट्रीय राजकारणात मोठी झेप
विनोद तावडे यांचा राजकीय प्रवास पाहिला तर तो नक्कीच संघर्षमय राहिला आहे. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी संघटनेपासून सुरू झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतर त्यांनी भाजपच्या संघटनात्मक राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
मुंबई भाजपचे अध्यक्ष, महाराष्ट्र भाजपचे महासचिव, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. आता मात्र विनोद तावडे यांची खरी ताकद मानली जाते ती संघटन उभारण्याची आणि कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याची.
राष्ट्रीय पातळीवरील कमबॅक
2019 नंतर महाराष्ट्राच्या सक्रिय सत्ताकारणापासून काही काळ दूर गेलेल्या विनोद तावडे यांचा राष्ट्रीय राजकारणात झालेला पुनरागमनाचा प्रवास राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. 2020 मध्ये त्यांच्यावर राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी आली आणि 2021 मध्ये ते भाजपचे राष्ट्रीय महासचिव झाले. त्यानंतर बिहारसह विविध राज्यांमध्ये पक्षाच्या संघटनात्मक आणि निवडणूक रणनीतीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
बिहारनंतर आता उत्तर प्रदेशमध्ये अग्निपरीक्षा
बिहारमधील संघटनात्मक कामगिरीनंतर आता विनोद तावडे यांच्या समोर देशातील सर्वात मोठ्या राजकीय रणांगणांपैकी एक असलेल्या उत्तर प्रदेशची जबाबदारी आली आहे. 2027 ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे विनोद तावडेंची संघटनात्मक रणनीती, बूथ मॅनेजमेंट आणि कार्यकर्त्यांशी समन्वयाची क्षमता यांची मोठी परीक्षा होणार आहे.
महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब
महाराष्ट्रातून राष्ट्रीय राजकारणात गेलेल्या विनोद तावडेंना उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी मिळणे हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आणखी एक मोठे पाऊल मानले जात आहे.
शांत स्वभाव, पडद्यामागची रणनीती आणि संघटनावर मजबूत पकड याच जोरावर विनोद तावडे पुन्हा एकदा भाजपच्या राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकीय रणांगणात विनोद तावडे भाजपला पुन्हा किती मजबूत करून दाखवणार? राजकीय वर्तुळाचे लक्ष आता तावडेंच्या पुढील रणनीतीकडे लागले आहे.
