पुण्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. वडिलांसोबत बाईकवर प्रवास करणारा ११ वर्षांचा मुलगा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे घसरून खाली पडला आणि मागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला.
पुण्यात एका ११ वर्षांच्या मुलाचा अत्यंत दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. आपल्या वडिला आणि बहिणीसोबत मोटरसायकलवरून प्रवास करत असताना तो एका ट्रकच्या चाकाखाली आला. ही घटना सोमवारी दुपारी हिंजवडी परिसरात घडली, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
हिंजवडीजवळच्या माण गावचा रहिवासी असलेला हा मुलगा, त्याच्या वडिलांसोबत आणि बहिणीसोबत क्लासला जात होता. त्यावेळी नांदे-म्हाळुंगे रस्त्यावर हा अपघात झाला.
एफआयआरनुसार, एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली, ज्यामुळे ते तिघेही रस्त्यावर पडले. त्यानंतर ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, असं पोलिसांनी सांगितलं.
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यात असं दिसतंय की, मोटरसायकल डाव्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याचवेळी रस्त्याच्या खराब तुकड्यावरून बाईक घसरली आणि तो मुलगा थेट ट्रकच्या चाकाखाली पडला.
सीसीटीव्ही फुटेज समोर असूनही, पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरवर निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातामुळे स्थानिक नागरिक आणि हिंजवडी आयटी पार्कमध्ये रोज प्रवास करणारे प्रवासी प्रचंड संतापले आहेत. रस्त्याची देखभाल करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप अनेक जण करत आहेत. रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आणि धोकादायक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.


