ZP Elections and Panchayat Samiti Election Results 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल आज जाहीर होणार असून ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणारा हा निकाल मानला जात आहे.
ZP Elections and Panchayat Samiti Election Results 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांचा निकाल (Maharashtra ZP Elections Results 2026) आज जाहीर होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून पुढील चार ते पाच तासांत राज्याच्या ग्रामीण राजकारणाचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निकालाकडे सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
731 जिल्हा परिषद, 1,462 पंचायत समिती जागांसाठी मतदान
या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 731 जागा आणि पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांमध्ये सरासरी 68.28 टक्के मतदान झालं होतं. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असल्याने या निवडणुकांना ‘मिनी मंत्रालय’ असंही संबोधलं जातं.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी : कुणाची सरशी?
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळाली. याआधी झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगलं यश मिळालं होतं. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये निकाल वेगळे लागणार का, याची उत्सुकता आहे.
अजित पवारांच्या निधनाचा निवडणुकीवर परिणाम
या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात प्रचार मोठ्या प्रमाणात थंडावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य प्रमुख नेत्यांनीही प्रचारसभा टाळल्या होत्या. त्यामुळे तुलनेने कमी प्रचार झालेल्या या निवडणुकांचा निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेषतः अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातील मतदारांनी कोणाला कौल दिला, हे आज स्पष्ट होणार आहे. सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतो का, की इतर पक्ष बाजी मारतात, याचा फैसला निकालातून होणार आहे.


