Maharashtra Governor : केंद्र सरकारने विविध राज्यांच्या राज्यपाल आणि उपराज्यपाल पदांमध्ये मोठे फेरबदल जाहीर केले आहेत. तेलंगणचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.
Maharashtra Governor : केंद्र सरकारने गुरुवारी रात्री विविध राज्यांच्या राज्यपाल आणि उपराज्यपाल पदांमध्ये मोठे फेरबदल जाहीर केले. तेलंगणचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या जागी तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील विविध राज्यांमधील संवैधानिक पदांवर मोठे प्रशासनिक फेरबदल झाले आहेत.
महाराष्ट्राला सहा महिन्यांनंतर नवे राज्यपाल
महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सप्टेंबर 2025 मध्ये उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला होता. जवळपास सहा महिन्यांनंतर आता राज्याला पूर्णवेळ नवे राज्यपाल मिळाले असून जिष्णू देव वर्मा यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रपती भवनातून अधिकृत घोषणा
राष्ट्रपती भवनाने रात्री उशिरा निवेदन जारी करून या सर्व नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली. लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांची तेलंगणच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर राज्यांमधील महत्त्वाच्या नियुक्त्या
या फेरबदलांत आणखी काही महत्त्वाच्या नियुक्त्यांची घोषणाही करण्यात आली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे लडाखचे नायब राज्यपालपद सोपविण्यात आले आहे. तर माजी राजनैतिक अधिकारी तरणजीत सिंग सिद्धू यांची दिल्लीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निवृत्त लेफ्टनंट जनरल सैद अता हसनैन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. याशिवाय नंदकिशोर यादव यांना नागालँडच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासकीय सातत्य राखण्यासाठी फेरबदल
केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या या नियुक्त्या देशातील संवैधानिक कार्यालयांचे कामकाज सुरळीत राहावे यासाठी करण्यात आल्या असल्याचे सांगितले जाते. आगामी काळात अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे प्रशासनिक सातत्य आणि संवैधानिक देखरेख राखण्यासाठी हे फेरबदल महत्त्वाचे मानले जात आहेत.


