मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघातात दोन शिवभक्तांचा मृत्यू झाला. शिवजयंतीनिमित्त विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन गावाकडे धावत असताना भरधाव कारने धडक दिल्याने ओंकार आरडे आणि दर्शन शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.
Pune-Mumbai Highway Accident : शिवजयंतीच्या उत्साहात गावाकडे शिवज्योत घेऊन धावत जाणाऱ्या दोन तरुणांवर काळाने घाला घातला. मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन शिवभक्तांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे असून ते दोघेही मावळ तालुक्यातील शिंदेवाडी गावचे रहिवासी होते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
शिवज्योत आणण्यासाठी गेले होते विसापूर किल्ल्यावर
शिवजयंतीनिमित्त गावात शिवज्योत आणण्याची परंपरा असल्यामुळे हे दोघे आणि त्यांचे काही मित्र विसापूर किल्ल्यावर गेले होते. तेथून शिवज्योत घेऊन सर्वजण आपल्या गावाकडे धावत निघाले होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास नायगाव परिसरात दुर्दैवी अपघात घडला.
भरधाव कारने दिली जोरदार धडक
ओंकार आणि दर्शन हे रस्त्याच्या कडेला शिवज्योत घेऊन धावत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव कारने अचानक दुभाजक ओलांडला आणि दोघांनाही जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही तरुण दूर फेकले गेले. आसपासच्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
परिसरात शोककळा; कार चालकावर कारवाईची तयारी
शिवजयंतीच्या दिवशीच दोन तरुण शिवभक्तांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शिंदेवाडी आणि मावळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कार चालकाविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.
शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी (६ मार्च) सकाळी सात वाजल्यापासून लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, नेहरू रस्ता आणि बाजीराव रस्ता या प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.


