Mumbai Chhatrapati Sambhaji Nagar Flight: इंडिगो एअरलाईन्सने मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या विमानसेवेत २९ मार्चपासून मोठे बदल जाहीर केले आहेत. यानुसार, सायंकाळची फ्लाइट आता मुंबईच्या मुख्य विमानतळाऐवजी नवी मुंबई विमानतळावरून सुटेल.
छत्रपती संभाजीनगर : मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर दरम्यान विमान प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या विमान सेवेत २९ मार्चपासून महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. विशेषतः सायंकाळच्या फ्लाइटचे लोकेशन बदलल्यामुळे प्रवाशांना आता प्रवासाचे नियोजन नव्याने करावे लागणार आहे.
आता नवी मुंबईतून उड्डाण!
इंडिगोची सायंकाळची मुंबई–संभाजीनगर-मुंबई फ्लाइट आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाऐवजी नवी मुंबई विमानतळावरून (NMIA) चालवली जाणार आहे. ऑनलाईन बुकिंग सिस्टिममध्येही हे बदल अपडेट करण्यात आले आहेत.
प्रवाशांमध्ये नाराजी
नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी सध्या रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीची कामे प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरांतून तेथे जाणे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी 'एटीडीएफ'चे सुनीत कोठारी यांनी केली आहे.
पाहा उन्हाळी वेळापत्रकातील बदल (२९ मार्चपासून प्रभावी)
उन्हाळी वेळापत्रक लागू झाल्यामुळे सकाळच्या आणि सायंकाळच्या विमानांच्या वेळेतही फेरफार करण्यात आला आहे.
१. सकाळचे विमान (सकाळी)
मुंबई ते संभाजीनगर: सध्या सकाळी ६:१० ऐवजी आता पहाटे ५:३५ वाजता निघेल (६:४५ ला पोहोचणार).
संभाजीनगर ते मुंबई: सध्या ७:५० ऐवजी आता सकाळी ७:१५ वाजता उड्डाण घेईल (८:१५ ला पोहोचणार).
२. सायंकाळचे विमान (नवी मुंबईवरून)
नवी मुंबई ते संभाजीनगर: सध्या ७:३५ ऐवजी आता सायंकाळी ७:३० वाजता निघेल (८:२४ ला पोहोचणार).
संभाजीनगर ते मुंबई: सध्या रात्री ९:१५ ऐवजी आता रात्री ८:५५ वाजता उड्डाण घेईल (९:५० ला पोहोचणार).
का झाला हा बदल?
दरवर्षी उन्हाळी वेळापत्रकामध्ये (Summer Schedule) विमान कंपन्या आपल्या मार्गांमध्ये आणि वेळांमध्ये बदल करतात. मात्र, मुंबईतील वाढती गर्दी आणि नवी मुंबई विमानतळाचा वापर सुरू करण्याच्या हालचालींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. व्यावसायिक आणि पर्यटकांनी आता तिकीट बुक करताना विमानतळाचे लोकेशन (BOM ऐवजी NMIA) नीट तपासून घेणे आवश्यक आहे.


