विधीमंडळाच्या आवारात गुरुवारी (17 जुलै) जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानभवनाच्या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विधानभवनाच्या लॉबीमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. या प्रकाराचे पडसाद गुरुवारपासून थेट शुक्रवारी पहाटेपर्यंत उमटत राहिले.

"सल्ला असा जो करेल पैसा मोठा!"असं म्हणणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आरोप गंभीर होते. त्यांनी सांगितलं की, "पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख याला विधानभवनातच मारहाण केली. मारहाण करणारे नंतर पळून गेले, पण पोलिसांनी उलट माझ्याच कार्यकर्त्याला अटक केली."

आव्हाडांचा संताप अनावर

आव्हाड यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, "हे प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या इतकं शरण गेलंय, हे मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं. अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही." त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, "माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी इथून हलणार नाही." त्यांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला आणि पोलिसांच्या वाहनासमोर बसून आंदोलनही केलं. त्याचा व्हिडिओ आव्हाड यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर शेअर केला. 

Scroll to load tweet…

वादाची सुरुवात

हा वाद काही दिवसांपूर्वीच पेटला होता. विधानभवनाच्या आवारात जितेंद्र आव्हाड यांनी गोपिचंद पडळकर यांना "मंगळसूत्र चोर" म्हणत डिवचलं होतं. त्यानंतर काल दोघे आमने-सामने आले आणि दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ करत धमकावलं. त्यानंतर आव्हाड यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला होता.

विधानभवनात दोन गटात वाद

या सगळ्या पार्श्वभूमीवर, काल दोन्ही नेत्यांचे समर्थक विधानभवनाच्या लॉबीमध्ये भिडले. एकमेकांच्या अंगावर धाव घेत हातघाईवर आले. तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी आणि अधिकाऱ्यांनी मध्ये पडून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या प्रकारामुळे विधानभवनात तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि शिस्तीच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित झाले.