येत्या काही दिवसांवर गणशोत्सवाचा सण येऊन ठेपला आहे. अशातच मोठ्या गणपतींच्या मुर्तींचे विसर्जन कुठे करायचे असा प्रश्न उपस्थितीत झाला होता. यावरच मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने विसर्जनासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले.
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत महत्त्वाचे प्रतिज्ञापत्र सादर केले. यानुसार, घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन परंपरेप्रमाणे समुद्रातच केले जाणार आहे. मात्र, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने पीओपीवर प्रश्नचिन्ह
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींमुळे जलप्रदूषण आणि पर्यावरणीय धोके निर्माण होतात. याबाबत उच्च न्यायालयात पर्यावरणवादी रोहित जोशी यांनी याचिका दाखल केली होती. दुसरीकडे, पीओपी मूर्तींवर बंदी आल्यास हजारो मूर्तिकारांचे रोजगार धोक्यात येतील, असा दावा करत मूर्तिकार संघटनांनीही न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेतराजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडून अभ्यास
या प्रश्नावर मध्यम मार्ग शोधण्यासाठी राज्य सरकारने राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या माध्यमातून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नेमला होता. या अभ्यासगटाच्या शिफारशींवर आधारित निर्णय घेण्यात आला. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या शिफारशी न्यायालयात सादर केल्यानंतर, न्यायालयाने पीओपीवरील बंदी उठवली होती.
मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत महत्त्वाचे निर्देश
राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सादर केलेल्या माहितीनुसार, 5 ते 10 फूट उंचीच्या सुमारे 3,865 मूर्ती असून, 10 फूट पेक्षा जास्त उंचीच्या सुमारे 3,998 मूर्ती आहेत. या पार्श्वभूमीवर खंडपीठाने नमूद केले की, 7 हजारांहून अधिक मोठ्या मूर्तींचा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन केल्यास पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो.
कृत्रिम तलावाची शक्यता तपासा
न्यायालयाने राज्य सरकारला विचारले की, 7 ते 8 फूटांहून अधिक उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करता येईल का? तसेच, अशा मूर्तींसाठी 25 फूटांपेक्षा खोल कृत्रिम तलाव तयार करता येणार का? याबाबत सविस्तर उत्तर द्यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले.
शंभर वर्षांची सार्वजनिक उत्सव परंपरा अबाधित
मुंबईसह महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा शंभर वर्षांहून जुनी असून, तिचा अविभाज्य भाग असलेल्या मूर्ती विसर्जनाला बाधा न आणता उत्सव पार पाडण्यासाठी राज्य सरकारने आश्वासन दिले आहे. घरगुती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांमध्ये पूर्वीप्रमाणेच व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.


