Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्जांची छाननी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 इतका आर्थिक लाभ मिळतो. मात्र जुलै महिन्याचा हप्ता अजूनही त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. तथापि, आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने अर्जांची छाननी तात्पुरती थांबवली आहे. त्यामुळे ज्या महिलांना अपात्र ठरवले जाण्याची भीती होती, त्यांना सध्या थोडा दिलासा मिळालाय.
अर्जांची छाननी का थांबवली गेली?
राज्यभरात लवकरच महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. अशा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जर महिलांना या योजनेतून अपात्र ठरवलं गेलं असतं, तर त्याचा राजकीय परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे शासनाने अर्जांची छाननी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सध्या २ कोटी ३४ लाख महिला आहेत. सरकारकडून सांगण्यात आले आहे की, १२ हप्ते वितरित करण्यात आले असून जुलै महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे.
छाननी पुन्हा कधी सुरू होणार?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यावरच अर्जांची छाननी पुन्हा सुरू केली जाणार आहे. त्यानंतरच नवीन लाभार्थींची नोंदणी व अपात्र लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया पुढे नेली जाईल.
जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार?
महिलांना अद्याप जुलैचा हप्ता मिळालेला नाही. जुलै महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल. शासन निर्णयानुसार, पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला ₹1500 वितरित केले जातात. तसेच, PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र महिला शेतकऱ्यांना अतिरिक्त ₹500 दिले जातात. अशा लाभार्थी महिलांची संख्या सुमारे ७ लाख आहे.
योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण
या योजनेचा वार्षिक खर्च सुमारे ₹35 ते ₹40 हजार कोटी इतका आहे. सरकारने महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी ही योजना सुरू केली असून, इतक्या मोठ्या संख्येने महिलांना दरमहा थेट आर्थिक सहाय्य मिळतं आहे.
राज्यातील लाखो महिलांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. छाननी प्रक्रियेची तात्पुरती स्थगिती ही महिलांसाठी सध्या दिलासा देणारी बाब असली तरी, जुलै महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा आहे. शासनाकडून पुढील अपडेट लवकरच दिले जातील.

