Farmer Suicide in Vidarbha : विदर्भात दोन दिवसांत पाच शेतकऱ्यांची आत्महत्या

| Published : Jul 01 2024, 11:40 AM IST

FARMER SUICIDE2

सार

Farmer Suicide in Vidarbha : गतवर्षी झालेली नापिकी, न मिळालेली मदत आणि या वर्षी बँकांनी रोखलेले कर्जवाटप आदी कारणांमुळे शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत.

Farmer Suicide in Vidarbha : विदर्भात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. मागील दोन दिवसांत विदर्भात पाच शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यामध्ये यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन आणि भंडारा जिल्ह्यात एका घटनेचा समावेश आहे. यामागे गतवर्षी झालेली नापिकी, न मिळालेली मदत आणि या वर्षी बँकांनी रोखलेले कर्जवाटप आदी कारणे असल्याचे शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

मागील ४८ तासांत विनोद ढोरे (रा.दाभेविरली, जि.भंडारा), भोजराज राऊत (रा.चोरटी) व नीलकंठ प्रधान (रा.रणमोचन), जि. चंद्रपूर, बन्सी पवार (रा. गांधीनगर) व दादाराव बोबडे (रा. गगनमाळ) जि. यवतमाळ या पाच जणांनी आत्महत्या केली. या वर्षी जूनपर्यंत पश्चिम विदर्भात ६९४, तर पूर्व विदर्भात २२८ शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली.

विदर्भात आतापर्यंत केवळ ४५ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. मागील हंगामात प्रचंड नापिकी झाली, कापूस आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही. त्यातच दुष्काळ घोषित करण्यात केला नाही. पीकविमाही समाधानकारक मिळाला नाही. यामुळे पश्चिम विदर्भापाठोपाठ आता पूर्व विदर्भातही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याचे किशोर तिवारी यांनी कळविले.

अमरावतीत पाच महिन्यांत १४३ घटना

मागील तीन वर्षातील सरकारी आकडेवारीनुसार, अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत चालला आहे. या वर्षी मे महिन्यापर्यंत अमरावती जिल्ह्यात १४३ शेतकरी आत्महत्या झाल्या. अमरावती जिल्ह्यात लागवडीखाली कापूस आणि सोयाबीनचा पट्टाही आहे. या जिल्ह्याच्या काही भागात नागपूर संत्र्याचीही लागवड होते. यवतमाळ जिल्ह्यात मे २०२४ पर्यंत १३२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी २०१५ ते २०२१ पर्यंत एकात्मिक कार्यक्रम सरकारकडे सादर करण्यात आला होता, अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली.

आणखी वाचा : 

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 4 जागांचा सोमवारी निकाल