सार
महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप देखील पार पडले आहे. आता जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद वाटपाचा कार्यक्रम बाकी आहे, आणि तो पुढच्या काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी नव्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आपल्या कार्यभाराची जबाबदारी स्वीकारत आहेत.
तर, एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांची दिल्लीतली भेट चर्चेचा विषय बनली आहे. या भेटीमागे नेमकं कारण काय असावं, असा सवाल अनेकांनाही पडला आहे. या भेटीबद्दल एकनाथ शिंदे यांनी स्वतःचं मत व्यक्त करत, ती फक्त एक सदिच्छा भेट होती, असे स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, "ही भेट कोणत्याही राजकीय चर्चेशिवाय फक्त सदिच्छा भेट होती. सरकारने केलेल्या कामांची पोचपावती राज्याच्या जनतेने दिली आहे. त्याचसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनी देखील आश्वासन दिलं की, महाराष्ट्राच्या विकासात केंद्र सरकारकडून कोणतीही कमतरता राहणार नाही."
शिंदे पुढे म्हणाले, "मंत्रिमंडळ विस्तारानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री किरण रिज्जू यांची भेट घेतली. आम्ही अडीच वर्षांत लोकाभिमुख सरकार कसं असावं हे दाखवलं, आणि लोकांनी आम्हाला मान्यता दिली. केंद्र सरकारचं समर्थन आमच्यासोबत आहे. आता आम्ही नवीन इनिंग सुरू करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास कसा होईल, यावर चर्चा करणार आहोत."
वन नेशन, वन इलेक्शनवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी "वन नेशन, वन इलेक्शन"वर देखील आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, "सतत होणाऱ्या निवडणुका विकासाला खूप अडथळा ठरतात. देशाच्या प्रगतीसाठी 'वन नेशन, वन इलेक्शन'ची आवश्यकता आहे. एनडीएची बैठक होती, त्यामुळे मी त्यात सहभागी होऊ शकलो नाही. एनडीए मजबूत आहे आणि आम्ही इंडिया अलायन्सप्रमाणे स्वार्थासाठी एकत्र आलेलो नाही."
महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारच्या कामकाजात नवा अध्याय सुरू होण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली आहे. शिंदे आणि मोदींच्या या भेटीमुळे राज्याच्या विकासासाठी आणखी एक नवीन दिशा उघडू शकते, हे देखील स्पष्ट होत आहे.