DCM Sunetra Pawar : दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली.
DCM Sunetra Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुंबईतील लोकभवन येथे पार पडलेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पदाची शपथ दिली. या ऐतिहासिक क्षणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
लोकभवनात शपथविधी, ऐतिहासिक क्षण
सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. या शपथविधीला मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते, अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
फडणवीसांची देवगिरी येथे भेट
शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवगिरी येथे जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये राज्याच्या सद्यस्थितीवर आणि भविष्यातील प्रशासनाबाबत चर्चा झाली. यावेळी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सांत्वनपर पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना सांत्वनपर आणि शुभेच्छा संदेश दिला आहे. हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः देवगिरी येथे जाऊन सुनेत्रा पवार यांना सुपूर्द केले. या पत्रातून मोदींनी त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
‘अजितदादांचे स्वप्न पुढे नेतील’ – नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, सुनेत्रा पवार या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी निष्ठेने कार्य करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य अधिक प्रगती करेल, असेही त्यांनी नमूद केले.
अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले होते. खासगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंगदरम्यान हा अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता.
राज्यभर शोककळा, बारामतीत अंत्यसंस्कार
अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली होती. लाखो समर्थक, चाहते आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत 29 जानेवारी रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


