राज्य सरकारने अंत्योदय रेशनकार्डधारक महिलांसाठी सुरू असलेली एक योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो गरीब महिलांना दिवाळीपूर्वी मोठा धक्का बसला आहे.

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून लाखो महिलांची नावे वगळण्यात आली. अशातच आता राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना दरवर्षी दिवाळीनिमित्त मोफत साडी दिली जायची. यासाठी मोफत साडी योजना सरकारने सुरू केली होती. पण याच योजनेबद्दल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

एकनाथ शिंदे सरकारने सुरू केली होती योजना

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जून 2023 मध्ये गरीब महिलांसाठी मोफत साडी योजना सुरू केली होती. अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना दरवर्षी एक मोफत साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 25 लाख महिलांना मिळत होता.

दिवाळीपूर्वी लाभार्थी महिलांना धक्का

वर्ष 2023, वर्ष 2024 आणि वर्ष 2025 या तीन वर्षांत महिलांना मोफत साड्यांचे वितरण करण्यात आले. मात्र यंदा दिवाळीपूर्वीच मोफत साडी योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात वस्त्रोद्योग विभागाने निर्णय जारी केला आहे. यामध्ये असून आर्थिक ताणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही योजना आता बंद झाल्याने लाखो लाभार्थी महिलांना मोठा धक्का बसला आहे.

आर्थिक भारामुळे योजना बंद

या योजनेसाठी राज्य सरकारकडून दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत होती. राज्याच्या तिजोरीवर वाढता आर्थिक भार पडत असल्याने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

लाडकी बहीण योजनेनंतर नवा निर्णय

याआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 92 लाख महिलांची नावे अपात्र ठरवत वगळण्यात आली होती. त्यानंतर आता मोफत साडी योजनेलाही कात्री लागल्याने राज्यातील महिला लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.