महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील नवे अर्थमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांसोबतच्या त्यांच्या भेटींमुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्याच्या घडीला कधी काय होईल सांगता येत नाही. जयंत पाटील हे महाराष्ट्राचे नवीन अर्थमंत्री असतील अशी माहिती समोर आली आहे. जयंत पाटील यांची वर्षा बंगल्यावरील भेट, शरद पवार आणि एकनाथ शिंदे भेट तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाटील यांनी घेतलेली भेट यामुळं शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाते की काय अशी परिस्थिती तयार झाली होती.

एकनाथ शिंदे यांची जयंत पाटलांनी घेतली भेट 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जयंत पाटील यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी पक्षाकडं जर अर्थ खाते दिले तर निधी देताना आपली अडचण होईल असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं होत. त्यामुळं जयंत पाटील यांनी शिंदेंची भेट घेतल्याचं सूत्रांकडून समजलं आहे. हे अधिकृत जरी सांगण्यात आलं नसलं तरी पडद्यामागून सूत्र हलली आहेत.

भेटीगाठी वाढल्या 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीतील नेत्यांच्या गाठीभेटी मागील काही दिवसांपासून वाढल्या होत्या. जयंत पाटील आणि भाजपा नेते विनोद तावडे हे मागे काही दिवसांपूर्वी भेटले होते. त्यानंतर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. आता उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर अर्थ खात जयंत पाटलांकडं दिलं जाईल असं सांगण्यात येत आहे.