मुंबई महापालिकेने रात्री पुन्हा दादरमधील कबुतरखान्याला ताडपत्री लावली आहे, पण याआधी 6 ऑगस्टला जैन समुदायाकडून ती फाडण्यात आली होती. 

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. याआधी मुंबई महानगरपालिकेने ताडपत्री टाकून कबुतरखाना बंद केला होता. मात्र, ६ ऑगस्टला जैन समुदायाने अचानक कारवाई करत ही ताडपत्री फाडून टाकली. यावेळी परिसरात जमलेला जैन समाज प्रचंड आक्रमक झाला होता. बांबू मोडणे, ताडपत्री कापणे आणि काही महिला चाकू घेऊन येणे अशा घटना घडल्या. यानंतर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी “आमच्या धर्मासमोर न्यायालयालाही मानत नाही” असे जहाल विधान केले, ज्यामुळे संतापाची लाट उसळली.

या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीने आता जैन समाजाच्या या वागणुकीला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. कायदा न मानणारे, पोलिसांशी धक्काबुक्की करणारे आणि न्यायालयाच्या आदेशानंतरही कबुतरांना दाणा घालणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी समितीची मागणी आहे. कबुतरखाना कायमचा बंद करण्यासाठी समितीने बुधवारी दादरमध्ये आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. पोलिस या आंदोलनाला परवानगी देतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच मनसे, ठाकरे गट यांसारखे पक्ष या आंदोलनाला पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जैन मुनींच्या वक्तव्याच्या काही तासांतच मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा कबुतरखाना ताडपत्रीने झाकून टाकला. यावेळी अधिक मजबूत पद्धतीने चारही बाजूंनी ताडपत्री लावून कबुतर आत येऊ नयेत याची काटेकोर व्यवस्था करण्यात आली. गोलाकार बॅरिकेड्स आणि मोठा पोलीस बंदोबस्त लावून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे ६ ऑगस्टप्रमाणे यावेळी जैन समुदायाला आंदोलन करणे शक्य होणार नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार, पुढील सुनावणी १३ ऑगस्टपर्यंत कबुतरखाना बंद ठेवण्यात येणार आहे.