मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये शुक्रवारी रात्री वर्षा बंगल्यावर दीड तास चर्चा झाली. यावेळी उपराष्ट्रपती पदासाठी काय निर्णय होणार याबद्दलही बोलले गेले.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी शुक्रवारी रात्री वर्षा निवासस्थानी दीडतासाहून अधिक वेळ बैठक घेतली. या चर्चेत महायुतीतील समन्वय, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि मराठा आरक्षण आंदोलन यावर सविस्तर चर्चा झाली.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून महायुतीत समन्वयाचा अभाव जाणवत होता. मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे वातावरण ढवळून निघाले होते. त्यामुळे आगामी काळात हे प्रकार टाळून महायुती अधिक भक्कम करणे, तिन्ही पक्षांचे मंत्री, आमदार आणि नेत्यांमध्ये संवाद वाढवणे यावर एकमत झाले. लवकरच या निर्णयांची माहिती सर्वांना देण्यात येईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही प्राथमिक चर्चा झाली. शक्य तिथे महायुती करण्याचा प्रयत्न करावा, तर महायुती न झाल्यास आणि त्याचा फायदा विरोधकांना होत असेल तर तीनही पक्ष एकत्र लढण्याचा प्रयत्न करतील, अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली.
नियुक्त्यांबाबत आग्रह
महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत. या नियुक्त्या स्थानिक निवडणुकांपूर्वी कराव्यात, असा आग्रह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बैठकीत धरला.
मनोज जरांगे पाटील आंदोलन
मराठा आरक्षणासाठी नेते मनोज जरांगे पाटील हे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन कसे हाताळावे यावरही तिन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक
एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा मिळावा यासाठी चर्चा झाली. मात्र विरोधी पक्षातील नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले की, राधाकृष्णन आमच्या विचारसरणीचे नाहीत, त्यामुळे त्यांना समर्थन देणे शक्य नाही.
शरद पवारांची स्पष्ट भूमिका
शरद पवार यांनी सांगितले की, राधाकृष्णन राज्यपाल असताना झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनातच अटक झाली होती. सत्तेचा गैरवापर झाल्याचे हे ढळढळीत उदाहरण आहे, त्यामुळे अशा व्यक्तीसाठी मतांची अपेक्षा करणे योग्य नाही.
उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने त्यांना पाठिंबा द्यावा म्हणून फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही फोन केला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, विरोधी पक्षाने उमेदवार दिल्याने आम्हाला त्यांच्यासोबत जाणे अपरिहार्य आहे. तरीदेखील कर्तव्य म्हणून फडणवीसांनी संपर्क साधला होता.


