भाजपाकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. यांच्या कुटुंबातील पुतण्याने तीन ठिकाणी मतदान केल्याचा आरोप आहे. 

मुंबई : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मतदार यादीतील मोठ्या घोळाकडे लक्ष वेधलं असून, अनेक जिवंत व्यक्तींना मृत दाखवण्यात आलं आहे, तर काहींची नावे दोन ते तीन मतदारसंघांत दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं. राहुल गांधींच्या या आरोपानंतर भाजपने काँग्रेसवर पलटवार केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतण्याचे तीन ठिकाणी मतदान

भाजपने काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. कराडमधील भाजप आमदार अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचे मतदान तीन वेगवेगळ्या ठिकाणी आहे. याचबरोबर त्यांच्या पत्नी, आई आणि मुलगा यांची नावेही मतदार यादीत तिप्पट नोंद झालेली आहेत.

दुसऱ्या पुतण्याच्या कुटुंबीयांचीही दुबार नावे

पृथ्वीराज चव्हाण यांचे दुसरे पुतणे राहुल चव्हाण यांच्या परिवाराचेही तीन ठिकाणी मतदान नोंदले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या नोंदणीसाठी वय बदलून नावांची नोंद केल्याचेही भाजपकडून सांगितले गेले. काँग्रेसच्या बोगस मतदान संशोधन समितीचे अध्यक्ष असूनही स्वतःच्या मतदारसंघात असा प्रकार करणं नैतिक नाही, असा आरोप भाजपकडून करण्यात आला.

चव्हाण कुटुंबातील 9 जणांची दुबार नावे

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात चव्हाण कुटुंबातील 9 लोकांची दुबार नावे असल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी या दुबार मतदार नोंदणीच्या आधारे विजय मिळवला. कराडमधील पाटण कॉलनीतील घरात 15 नावं असून, त्यातील अनेकजण तेथे राहतच नसल्याचंही नमूद करण्यात आलं.

भाजपकडून गंभीर आरोप

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, दुबार व तिबार नावात पृथ्वीराज चव्हाण यांचे भाऊ, पुतणे, वहिनी यांच्यासह कुटुंबीयांची नावे आहेत. केवळ कराड दक्षिणच नव्हे तर पाटण विधानसभा मतदारसंघातही ही नावे असल्याचं समोर आलं. त्यामुळे चव्हाण कुटुंबाने दीर्घकाळापासून बोगस मतदान करून निवडणुका जिंकल्या असल्याचा ठपका भाजपने ठेवला आहे.

फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, अतुल भोसले यांनी केलेल्या आरोपांवरूनच खरे "वोट चोर" कोण आहेत हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे याबाबत राहुल गांधींनी उत्तर द्यावं, असा टोला त्यांनी लगावला.