सुरज चव्हाण यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहणा केल्याने राजकरण तापले आहे. याशिवाय कार्यकर्त्याने त्याला होणाऱ्या वेदना बोलून दाखवल्या असून यावर राज्य सरकार आणि अजित पवार यांची काय भूमिका असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुंबई : राज्यात आमदार आणि सत्ताधाऱ्यांची मस्ती संपायचं नाव घेत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आमदार माजले आहेत’ असं जाहीरपणे म्हटल्यावरही काही नेत्यांची मनोवृत्ती बदलताना दिसत नाही. याचे ताजं उदाहरण लातूरमध्ये रविवारी पाहायला मिळालं. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले, याच कारणावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांवर बेदम हल्ला चढवला.
छातीत बुक्क्यांनी मारहाण
या हल्ल्यामुळे विजयकुमार पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 'एबीपी माझा'शी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की, “माझ्या छातीत आणि पाठीत प्रचंड वेदना आहेत. डाव्या डोळ्यातून पाणी येतंय आणि समोरचं डबल दिसतंय. उद्या डॉक्टरी अहवालात काय निष्कर्ष येतो, ते बघावं लागेल.” पाटील हे एका खोलीतील सोफ्यावर निवांत बसले होते, तेव्हाच सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अचानक हल्ला चढवला आणि जबरदस्त मारहाण केली.
छावा संघटनेचा संताप
छावा संघटनेने याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संघटनेचे पदाधिकारी सांगतात, "विजयकुमार पाटील हे केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निवेदन देण्यासाठी गेले होते. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानभवनात गेम खेळत आहेत, यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आमच्या कार्यकर्त्यांवरच प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला नियोजित होता.”
छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष जावळे यांनी स्पष्टपणे सांगितलं, “छावाचा इतिहास आहे, आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. सूरज चव्हाण याला माफ करणं शक्य नाही. त्याच्यावर तात्काळ अटक झाली पाहिजे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अजित पवार यांनी याप्रकरणात लक्ष घालणं आवश्यक आहे.”
नक्की काय घडले?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे २० जुलै रोजी लातूरमध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मात्र, पत्रकार परिषद संपल्यानंतर वातावरण अचानक तापलं, कारण अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत निवेदन सादर केलं.
छावा कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की, "सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही", हे स्पष्ट करत त्यांनी सुनील तटकरेंच्या समोरच पत्ते टाकले, जे निषेधाचे प्रतीक मानले गेले. यानंतर दोन्ही गटांमध्ये तणाव वाढला आणि वाद विकोपाला गेला.याच दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला – विजय घाडगे यांना – कोपराने आणि बुक्क्यांनी मारहाण केली, अशी माहिती समोर आली आहे. या हाणामारीनंतर वातावरण आणखीनच पेटलं आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
या प्रकारामुळे लातूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, सोमवारी शहर बंदची हाक छावा संघटनेने दिली आहे. सामान्य कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता राज्य सरकार आणि अजित पवार यांची पुढील भूमिका काय असेल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


