Pratap Sarnaik on Thackeray And Shinde Together : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा युती होऊ शकते, असा दावा केला आहे. 

मुंबई : शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना नवसंजीवनी देणारा विजयी मेळावा नुकताच पार पडला. तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर एकत्र आले. याच पार्श्वभूमीवर आता आणखी एक महत्त्वाचं राजकीय भाकीत चर्चेत आलं आहे. शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांनी दावा केला आहे की, "राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतात, तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचंही पुन्हा मनोमिलन होऊ शकतं!" या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

"शिवसेनेचा ब्रँड म्हणजे एकनाथ शिंदेच"

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दोन भागात विभागली गेली. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि वैर कायम आहे. मात्र, प्रताप सरनाईक यांनी शांततापूर्ण सूर लावत म्हटलं की, “राजकीय गरजांनुसार मतभेद बाजूला ठेवून पुढे जाणं शक्य आहे.” सरनाईक पुढे म्हणाले, "आज राज-उद्धव एकत्र आलेत, उद्या उद्धव-शिंदेही येऊ शकतात. राजकारणात काहीही शक्य आहे."

वादग्रस्त व्हिडिओंवरही मतप्रदर्शन

गेल्या काही दिवसांत विधिमंडळात विविध आमदारांचे वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाले. यावर बोलताना सरनाईक म्हणाले, "फक्त आमच्याच पक्षाचे नव्हे, सर्वच पक्षांचे आमदार कधीमधी मर्यादा ओलांडतात. मात्र शिंदे साहेबांनी आमच्या आमदारांना सूचना केल्या असून त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे."

"जादूटोणा करून आमदार निवडून आले?", ठाकरेंच्या आरोपाला प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर जादूटोणा करून आमदार निवडून आणल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रताप सरनाईक म्हणाले, "तुमचे आमदार निवडून आले ते कोणत्या मंत्रामुळे? मग आमचेच जादूटोण्याने आले का? लोकसभा निवडणुकीत तुमचे खासदारही काय जादूटोण्याने आले होते का?"

सरनाईकांनी पुन्हा स्पष्ट केलं की, "शिवसेनेचा खरा ब्रँड म्हणजे एकनाथ शिंदे. आज ते आमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत आहेत, आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही पुढील वाटचाल करत आहोत."