भिवंडीतील नारपोली परिसरात चार मजली इमारतीचा एक भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. सध्या ठिकाणी एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. 

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. नारपोली परिसरातील भंडारी कंपाऊंडमधील चार मजली कोहिनूर इमारतीचा एक भाग अचानक कोसळला गेला. सदर घटनेत अनेजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.

अचानक कोसळला इमारतीचा भाग

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सकाळी काही कामगार इमारतीच्या तळमजल्यावर काम करत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि इमारतीचा एक भाग क्षणात कोसळला. काही क्षणांतच परिसर धुळीचे लोट बाहेर पडू लागले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत ढिगाऱ्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

सहाजणांचा मृत्यू

या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती ANI कडून देण्यात आली आहे. मृतांपैकी एका कामगाराची ओळख 32 वर्षीय शमीम शेख अशी झाली आहे. उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असल्याने शोध आणि बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.

एनडीआरएफकडून बचावकार्य

दुर्घटनेनंतर एनडीआरएफच्या पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर एका महिला आणि एका लहान मुलीसह तीन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. बचावलेल्या मुलीने सांगितले की, दुर्घटनेच्या वेळी तिचे आई-वडील बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र ती ढिगाऱ्याखाली अडकली होती.

Scroll to load tweet…

इमारत आधीच धोकादायक घोषित

स्थानिक आमदार महेश चौघुले यांनी सांगितले की, कोहिनूर इमारतीला महापालिकेने यापूर्वीच 'सी' श्रेणीतील धोकादायक इमारत म्हणून घोषित केले होते. इमारत रिकामीही करण्यात आली होती. मात्र, तळमजल्यावर काही कामगारांकडून बांधकाम किंवा पाडकामाचे काम सुरू होते. प्राथमिक माहितीनुसार, एकाचवेळी तीन खांब हटवल्यामुळे इमारतीचा तोल गेला आणि 'बी' विंगचा भाग कोसळला असावा. या दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.

जेसीबी आणि आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने बचावकार्य

एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिका यांचे संयुक्त पथक घटनास्थळी बचावकार्य करत आहे. जेसीबी, हायड्रॉलिक उपकरणे, गॅस कटर आणि इतर आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने ढिगारा हटवून अडकलेल्यांचा शोध सुरू आहे.