राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे. यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. तर एकूणच पुढील 24 तास फार महत्वाचे असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
मुंबई : राज्यात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. ओडिशावरील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
4 जिल्ह्यांना रेड अलर्ट; अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि जळगाव जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 31 जुलैपर्यंत या भागांत अतिवृष्टी, विजांचा कडकडाटासह वेगाने वारे वाहू शकतात. यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अमरावतीत ढगफुटीसदृश पाऊस
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने सुमारे 100 नागरिकांना रात्रीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
यवतमाळमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी शाळा-महाविद्यालयांना उद्याची सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई-ठाण्यात पावसाची स्थिती
मुंबईत आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. काही भागांत जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पण ठाण्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या ठिकाणांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
पालघर, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय येथे भूस्खलन आणि अचानक पूर येण्याचा धोका असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


