Pimpri Chinchwad Building Collapse : पुण्यातील पिंपरी - चिंचवडमध्ये इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत १५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पुणे : राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यभरात मुसळधार आलेल्या पावसाने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. नुकतीच पुण्यात एक इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या इमारतीखाली जवळपास १५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये इमारत कोसळली
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपोजवळ एक मोठी इमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. ही इमारत कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं.
इमारत कोसळल्यानंतर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १५ जण अडकल्याची माहिती मिळते आहे. मोशी येथील कचरा डेपोला लागूनच ही इमारत होती. मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा ढीग, कचऱ्याचा भलामोठा डोंगर इमारतीवर आला आणि त्यातूनच ही दुर्घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पुण्यात अतिमुसळधार पाऊस
दरम्यान, पुण्यात मुसळधार पाऊस आहे. सोमवारी रात्री १० वाजल्यापासून ते मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पुण्यात अतिमुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. पुण्यासह पिंपरी - चिंचवडमध्ये जोरदार पावसाने अनेक रस्ते जलमय झाले आहेत. नद्यांना पूर आला आहे. पावसाचं पाणी अनेक नागरिकांच्या घरात, दुकानांत शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. पुणे शहरात पाणीपुरवठा करणारं खडकवासला धरण १०० टक्के भरलं आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. यादरम्यान, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसात नदी, धबधबे, धरणांवर न जाण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिश महाजन यांनी दिला आहे. प्रशासनाच्या सूचनांचं नागरिकांनी काटेकोर पालन करावं, तसंच प्रशासनाला सहकार्य करावं, अशा सूचना पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी केल्या आहेत.

