सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांचा फेसबुक लाईव्ह दरम्यान उसाची ट्रॉली अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नी अश्विनीच्या डोळ्यादेखत घडलेल्या या घटनेने त्यांच्या संघर्षमय आणि प्रेमळ आयुष्याचा करुण अंत झाला आहे. 

बीड : ऊसतोड मजुरांच्या संघर्षाची गाथा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर मांडणाऱ्या एका 'रिलस्टार' जोडप्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच पत्नीच्या डोळ्यादेखत पतीवर उसाची ट्रॉली उलटली आणि गणेश डोंगरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दोन मिनिटांपूर्वी हसत-खेळत संवाद साधणारा माणूस क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्याने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

लाईव्हमध्ये कैद झाला थरार

बीड जिल्ह्यातील डोंगरेवाडी येथील गणेश डोंगरे आणि त्यांची पत्नी अश्विनी हे आपल्या रिल्समुळे प्रसिद्ध होते. लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर उसाची गाडी रिकामी करण्यासाठी ते वाट पाहत थांबले होते. यावेळी अश्विनीने फेसबुक लाईव्ह सुरू करून कारखान्यावरील गर्दी आणि मजुरांची होणारी ओढाताण चाहत्यांना दाखवत होत्या. "गाडी लवकर खाली होत नाही, इथेच थांबावं लागतंय," असं त्या सांगत होत्या. कॅमेऱ्याच्या समोरच गणेश बसलेला होता. तितक्यात अचानक बाजूची उसाची ट्रॉली गणेशच्या अंगावर कोसळली. अश्विनीच्या मुखातून "बयो.." ही किंकाळी फुटली आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

एका 'लव्ह स्टोरी'चा करुण शेवट

गणेश आणि अश्विनी यांची जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होती. अत्यंत गरिबीतही आनंदी कसं राहायचं आणि उसाच्या चिपाडातलं आयुष्य कसं असतं, हे ते जगाला सांगायचे. मात्र, या अपघाताने त्यांच्या या संघर्षाच्या आणि प्रेमाच्या प्रवासाचा अत्यंत वेदनादायी अंत झाला आहे. गणेशच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुले असा परिवार असून हे कुटुंब आता पूर्णपणे उघड्यावर आले आहे.

मदतीसाठी धनंजय मुंडे सरसावले

या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

कुटुंबाचे पुनर्वसन: "गणेश डोंगरे यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब उघड्यावर पडणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ," असे आश्वासन मुंडेंनी दिले.

शासकीय मागणी: 'स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा'मार्फत या कुटुंबाला आर्थिक संरक्षण आणि मदत मिळावी, यासाठी आपण लेखी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरक्षेचा मुद्दा: ऊसतोड कामगारांच्या वाढत्या अपघातांवर ठोस धोरण राबवण्याची गरजही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

"परिस्थितीने गरीब पण स्वाभिमानाने जगणाऱ्या आमच्या ऊसतोड बांधवाचा असा अपघाती मृत्यू होणे हे अत्यंत वेदनादायी आहे." — धनंजय मुंडे