चला, चला वाघ बघायला, पुण्यात 10 जानेवारीला ताडोबातील पट्टेदार वाघ बघायला मिळणार!
Wildlife Festival For Kids at Pune on 10 January : पुण्यातील 'जंगल बेल्स', 'नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट' आणि 'बोगनव्हिला फार्म्स' यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी 'वाईल्डलाईफ फेस्टिव्हल'च्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाची वेळ आणि ठिकाण
हा महोत्सव शनिवार, १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४:०० ते रात्री ९:०० या वेळेत म्हात्रे पुलाजवळील डी.पी. रोडवरील 'बोगनव्हिला फार्म्स' येथे रंगणार आहे. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदाची आवृत्ती 'ताडोबा स्पेशल' असणार आहे. महोत्सवाचे प्रवेश शुल्क विनामूल्य असून, मुलांसोबत पालकांनाही यात सहभागी होता येईल, अशी माहिती 'जंगल बेल्स'च्या संस्थापिका हेमांगी वर्तक यांनी दिली.
महोत्सवातील प्रमुख आकर्षणे
या महोत्सवाला पुणे वन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) यांचे सहकार्य लाभले आहे. महोत्सवात खालील विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे:
ताडोबाची यशोगाथा: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर झोन) कुशाग्र पाठक हे ताडोबाच्या बफर झोनची निर्मिती आणि व्यवस्थापन यातील आव्हाने व यशोगाथा मांडणार आहेत. २ लाख लोकसंख्या आणि सुमारे २०० वाघ यांच्यातील सहअस्तित्वाचा रंजक प्रवास ते उलगडणार आहेत.
चित्रपट प्रदर्शन: नल्ला मुथू यांचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पावरील माहितीपट दाखवला जाईल.
'माया' वाघिणीची गोष्ट: 'एक होती माया' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक अनंत सोनवणे हे ताडोबाची शान असलेल्या 'माया' वाघिणीच्या कथा सांगतील.
रेस्क्यू ऑपरेशन्सचे थरार: ६० हून अधिक वाघांना जेरबंद करण्यात सहभागी झालेले ताडोबा रॅपिड रेस्क्यू टीमचे डॉ. रविकांत खोब्रागडे आपले अनुभव मांडतील.
वाघांची वंशावळ: 'टायगर लेगसी फिल्म सीरिज'चे सुमेश लेखी ताडोबातील प्रसिद्ध वाघांच्या वंशावळीबद्दल माहिती देतील.
'बर्डमॅन' सुमेध वाघमारे यांची कलाकारी
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ताडोबाचे 'बर्डमॅन' सुमेध वाघमारे यांची कामगिरी. सुमेध हे २०० पेक्षा जास्त पक्षी आणि प्राण्यांचे आवाज काढू शकतात. त्यांच्या या कलेचे खुद्द भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही कौतुक केले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या महोत्सवाचे उद्घाटन पुणे वन विभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकरे, 'एमटीडीसी'चे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटाणे, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण आणि वन्यजीव प्रेमी संजय देशपांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती 'नेचर वॉक'चे संस्थापक अनुज खरे यांनी दिली.

